मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून आरोपी मुलीचा पाठलाग करत होता. बुधवारी आरोपी अल्पवयीन मुलीच्या सोसायटीत दबा धरुन बसला होता. संध्याकाळी सात वाजल्यापासून आरोपी आदित्य दुर्गा दर्शन सोसायटीच्या आवारात येऊन रहिवाशांना संबंधित मुलगी घरी किती वाजता येते याची माहिती घेत होता.रहिवाशांना तो कशासाठी माहिती घेतो याची जाणीव झाली नाही. आदित्य मृत मुलगी राहत असलेल्या सोसायटी परिसरात दबा धरुन बसला होता.
मुलगी रात्री आठ वाजता तिच्या आईसोबत खासगी शिकवणी वर्गावरुन घरी येत होती. सोसायटीतील जिन्यातून घरात जात असताना आदित्यने मुलीच्या आईला ढकलून मुलीवर चाकूने आठ वार केले. तिच्या आईच्या विरोधाला न जुमानता आदित्यने मुलीवर एकामागोमाग वार केले. त्यानंतर मुलगी जिन्यात कोसळली. आईने आरडाओरडा करताच आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. आदित्य पळून जात असताना रहिवाशांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
मुलीला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. हल्लेखोर आदित्यने दोन वेळा प्रेमासाठी गळ घातली होती. मात्र, मुलीने त्यास नकार दिला होता. त्यातून आरोपीने हे कृत्य केले असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.