(मुंबई)
महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. बोर्डाच्या परीक्षेच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत घोळ झाल्याचे समोर आले होते. हा घोळ निस्तरला जात असतानाच आता हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चूक झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागले असल्याची तक्रार करण्यात येत आहे. हिंदीच्या प्रश्नपत्रिकेत पर्यायांना चुकीचे आकडे देण्यात आल्याने नेमके उत्तर काय लिहावे, असा प्रश्नच विद्यार्थ्यांना पडला होता.
इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तीन प्रश्नांमध्ये चूक झाल्याचे मंगळवारीच उघडकीस आले होते. आज हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुका झाल्याचे समोर आले आहे. दोन प्रश्नांमध्ये चुकीचे उपप्रश्न क्रमांक देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नेमका उपप्रश्न क्रमांक काय टाकायचा या संदर्भात संभ्रम निर्माण झाला.
हिंदीच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक दोनमध्ये चार शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत. मात्र, या शब्दांचे क्रमांक १,२,१,२ असे देण्यात आले आहेत. हे क्रमांक १,२,३,४ असे असायला हवे होते. तर चार समानार्थी शब्द लिहिण्यासाठी दिलेल्या चारही शब्दांना १,१,१,१ असे क्रमांक देण्यात आले आहेत. हे क्रमांक १,२,३,४ असे असायला हवे होते.
या अगोदर इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्नच छापून आला नाही. मात्र, त्याऐवजी थेट उत्तर छापण्यात आले होते. त्यावरून विद्यार्थ्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. बारावी बोर्डाच्या इंग्रजी पेपरमध्ये तीन प्रश्नांमध्ये एका प्रश्नात उत्तर दिले होते, तर इतर दोन प्रश्नांमध्ये तपासणा-याला सूचना दिल्यामुळे विद्यार्थ्यांना नेमके काय लिहायचे, याबद्दल संभ्रम निर्माण झाला होता.