( बुलढाणा )
सध्या बारावीची परीक्षा सुरु आहे. बारावी परीक्षेवेळी झालेल्या पेपरफुटी प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, याच्या चौकशीसाठी एसआयटी तपास पथक स्थापन केले आहे. बुलढाणा जिल्ह्यात बारावीच्या गणिताचा पेपर फुटल्याने शिक्षण प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. आतापर्यंत यातील आरोपींची संख्या ७ वर गेली आहे. दरम्यान, रविवारी पकडलेल्या दोन्ही आरोपी शिक्षकांना १० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या आरोपींना येथील देऊळगाव राजा न्यायालयात हजर करण्यात आले होते. मात्र अजूनही पेपर फोडणारा मुख्य आरोपी पोलिस शोधत आहेत.
३ फेब्रुवारी रोजी बारावीचा पेपर सुरू होण्याआधीच साडेदहा वाजता गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ही बातमी वा-याच्या वेगाने राज्यभर पसरली. पेपर सुरू होण्याआधीच पेपर फुटल्याने परीक्षा विभागाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले. पोलिसांनी तात्काळ तपास चक्रे फिरवून स्थानिक तब्बल ५ जणांना अटक केली होती, तर आतापर्यंत तो आकडा ७ झाला आहे. गंभीर बाब म्हणजे पहिल्या ५ पैकी २ जण हे संस्थाचालक शिक्षक असल्याचा समोर आले आहे.
व्हाट्सऍपचा ग्रुप करून या ग्रुपमध्ये गणिताचा पेपर लीक केला. तब्बल ९९ सभासद संख्या असलेल्या या व्हाट्सऍप ग्रुपमध्ये हा पेपर फुटल्याने सर्वत्र एकच खळबळ माजली. गणिताचा पेपर फोडायचा आहे, हे सर्व पूर्वनियोजित होते, त्यामुळे पोलिसांनी या पाचही जणांवर गुन्हा करण्याच्या उद्देशाने कट रचल्याचा, त्याचबरोबर फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.
या गैरप्रकारामुळे सिंदखेडराजा तालुक्यातील सर्व परीक्षा केंद्रांवरील केंद्र संचालक आणि पोलिस स्थानकातून प्रश्नपत्रिकांचे वितरण करणा-या रनरची तडका फडकी बदली केली गेली आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील सर्वच परीक्षा केंद्रांवर नवीन केंद्र संचालक आणि रनरची नियुक्ती करण्यात आली आहे. गणिताच्या पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून, त्याचा शोध पोलिस घेत आहेत. त्यातच आता या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी सुरू करण्यात येत असल्याने या पेपरफुटीचे गौडबंगाल उघड होणार आहे.