(रत्नागिरी)
आपल्या महाविद्यालयात एनएसएसचे काटेकोर नियोजन व उत्तम कार्यक्रम सुरू आहेत. विद्यार्थ्यांनी नेहमी कोणत्याही क्षेत्रात काम करताना सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही समाजासाठी योगदान द्यालच. आयुष्यात सर्व प्रकारच्या परीक्षांना शांतपणे धीरोदात्तपणे सामोरे जा. एनएसएस भावकीला कधीही विसरू नका. महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करा, असे आवाहन अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर यांनी केले.
कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या बारावीमधील स्वयंसेवकांच्या सदिच्छा समारंभात रविवारी ते बोलत होते. राधाबाई शेट्ये सभागृहात हा कार्यक्रम झाला. या वेळी व्यासपीठावर कला विभागप्रमुख प्रा. वैभव कानिटकर, विज्ञान विभागप्रमुख प्रा. दिलीप शिंगाडे, एनएसएसचे माजी कार्यक्रमाधिकारी प्रा. प्रभात कोकजे, एनएसएसचे माजी स्वयंसेवक व दै. सकाळचे पत्रकार मकरंद पटवर्धन, कार्यक्रमाधिकारी प्रा. निनाद तेंडुलकर, प्रा. अनुष्का टिकेकर, प्रा. अभिजित भिडे, प्रा. अन्वी कोळंबेकर उपस्थित होते.
प्रा. कानिटकर यांनी मार्गदर्शन करताना महाविद्यालयात प्रवेश एनएसएसच्या शिबिरामध्ये व्यक्तीमत्व विकास, तडजोड, नियोजन अशा सर्वच गोष्टी शिकायला मिळतात. एका वारकऱ्याला दुसरा वारकरी भेटल्यानंतर जसा आनंद होतो, तसाच आनंद एनएसएसचे माजी विद्यार्थी भेटल्यानंतर होतो, असे सांगितले. याप्रसंगी बारावीमधील स्वयंसेवकांना दोन वर्षांच्या कामगिरीबद्दल भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालयाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. स्वयंसेवकांनी आपल्या मनोगतामध्ये एनएसएसचं त्यांच्या व्यक्तिमत्व विकासातील योगदान स्पष्ट केलं व आपल्या देशाप्रती व समाजाप्रती असलेलं कर्तव्य कळलं, अशा भावना व्यक्त केल्या.
प्रतिवर्षी राष्ट्रीय सेवा योजनेतून बाहेर पडलेल्या व समाजामध्ये खूप चांगलं काम करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येतो. यावर्षी रत्नागिरीमधील पत्रकार श्री. मकरंद पटवर्धन यांना त्यांच्या पत्रकारिता व सामाजिक योगदानाबद्दल एनएसएस विभागातर्फे सन्मानित करण्यात आलं. स्वागत व प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा. निनाद तेंडुलकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अन्वी कोळंबेकर यांनी केले. आभार सहकार्यक्रमाधिकारी प्रा. अभिजीत भिडे यांनी मानले.