(मुंबई)
महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी २ फेब्रुवारीपासून कामकाजावर बहिष्कार घातल्याचा फटका बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांना बसत आहे. राज्य सरकारने मागण्या मान्य न केल्यास २० फेब्रुवारीपासून बेमुदत काम बंदचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे या आंदोलनाची झळ २१ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या बारावीच्या लेखी परीक्षेलाही बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे..
दुसरीकडे २० फेब्रुवारीपर्यंत सर्व महाविद्यालयांतील बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा पूर्ण होतील, असे आश्वासन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिले आहे. सातवा वेतन आयोग, रिक्त पदे तात्काळ भरणे आणि जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी २ फेब्रुवारीपासून आंदोलन पुकारले आहे. यामुळे अनेक महाविद्यालयांमध्ये बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षा होऊ शकल्या नाहीत.