(मुंबई)
रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू, सोलगाव रिफायनरीप्रश्नी पुणे येथे ३० मे रोजी बैठक घेण्यात येणार आहे. मराठी पत्रकार संघाजवळील एस. एम. जोशी सोशालिस्ट फाऊंडेशन येथे दुपारी १२.३० वाजता ही बैठक होणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. भारत पाटणकर यांनी म्हटले आहे.
बारसू रिफायनरीला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असताना या प्रकल्पाच्या बऱ्या-वाईट परिणामांची शास्त्रीय पायावर काहीही चर्चा झालेली नाही. तसेच जनतेने उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे न देता, रिफायनरीविरोधी शांततेच्या मार्गाने सुरू असलेले आंदोलन केंद्र व राज्य सरकारने पोलिस बळाचा वापर करून दडपून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचबरोबर बारसू रिफायनरीविरोधी संघर्ष समितीचे नेतृत्व करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक केली व विरोध करणाऱ्या आंदोलक स्त्री- पुरुषांवर लाठीचार्ज केला आहे. हे आंदोलन कोणत्याही स्थितीत चिरडून टाकण्याचा डाव सरकारने आखला आहे.
या पार्श्वभूमीवर संपत देसाई, अंकुश कदम व सहकाऱ्यांनी बारसू परिसरातील आंदोलक, रिफायनरीविरोधी संघर्ष समितीचे नेते, कार्यकर्ते यांची भेट घेतली. या आंदोलनाला कसा पाठिंबा उभा करता येईल याची चर्चा केली. तसेच आंदोलनातील नेते सत्यजित चव्हाण यांच्याशी चर्चा करून बैठक घेतली. बैठकीला बारसू रिफायनरीविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अमोल बोले, दीपक जोशी आणि इतर सदस्यांसह कोल्हापूर जिल्ह्यातील विविध संघटनांचे ४० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. त्यामध्ये पुणे येथे बैठक घेण्याचा निर्णय झाला असल्याचे पत्रकात म्हटले आहे.