(रत्नागिरी)
कोकणातल्या मुली ग्रामीण भागात केक बनवणे, फॅशन डिझायनिंगसह वेगवेगळे व्यवसाय करतात. तुम्हाला आवडेल तो व्यवसाय करा. महिलांकडे कौशल्य असतेच. त्याला योग्य प्रशिक्षणाची जोड मिळाली तर अधिक यश मिळते. मरीन इंजिनिअरिंगच्या चाकोरीबाहेरच्या व्यवसायात इथल्या मुली रमल्या आहेत. मुली आत्मविश्वासाने काम करतात, असे प्रतिपादन मरीनर दिलीप भाटकर यांनी केले.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे कौशल्य विकास केंद्राच्या नवीन अभ्यासक्रमांच्या पहिल्या बॅचच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी समुद्री जीवनात जहाज दुरुस्ती, कोकणातील महिलांचे योगदान आणि आता लवकरच जयगड येथे जहाज तोडणी प्रकल्प आपण सुरू करत असल्याचे सांगितले. सर्व विद्यार्थिनींनी या प्रकल्पाला भेट द्यावी, असे आवाहनही केले. तसेच महर्षी कर्वे संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त केली, येथे कार्यक्रमाला येतो तेव्हा विशेष आनंद वाटतो, असे सांगितले. महर्षी कर्वे संस्थेत येताना नेहमीच आनंद होतो. कारण मेहनत, कष्ट, धडपडीतून ही संस्था मोठी झाली आहे, असे भाटकर यांनी सांगितले. या वेळी प्रकल्प प्रमुख मंदार सावंतदेसाई, समिती सदस्य प्रकाश सोहोनी, प्रकल्प समन्वयक स्वप्नील सावंत व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री. सावंत यांनी महर्षी कर्वे संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. कोरोना काळामुळ कौशल्य केंद्राच्या अभ्यासक्रमांमध्ये खंड पडला. परंतु आता नव्याने फॅशन डिझायनिंग, फूड, ब्युटी व वेलनेस आदी अल्प कालावधीचे कोर्स सुरू करण्यात येणार आहेत. शनिवारी, रविवारी आणि एकदिवशीय कोर्ससुद्धा भविष्यात सुरू केले जाणार आहेत. स्वतंत्र इमारतीमध्ये कौशल्य विकास कोर्स चालू करण्याचा मानस आहे. या केंद्रात जास्तीत जास्त मुलींनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन स्वप्नील सावंत यांनी केले.
कार्यक्रमात प्रकाश सोहोनी यांनी सांगितले, दरवर्षी लाखो विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडत असल्याने सर्वांनाच नोकरी मिळणे शक्य नाही. त्यामुळे बेरोजगारी वाढणार आहे. सर्वांनाच नोकरी मिळणार नाही. अशा वेळी विद्यार्थ्यांनी स्वतःमधील कौशल्ये शोधून, प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगार, उद्योजक बनले पाहिजे.
अध्यक्षीय भाषणात मंदार सावंतदेसाई यांनी बाया कर्वे यांनी महिलांच्या उन्नतीसाठी अनेक उपक्रम राबवले. त्यामुळेच आज महिलांना शिक्षण व मोठ्या करिअरच्या संधी मिळत आहेत. कर्वे शिक्षण संस्थेचे महाराष्ट्रातले पहिले बीसीए कॉलेज शिरगावात सुरू झाले. आता या केंद्राद्वारेही महिलांना कौशल्य विकासासाठी पर्यटन, फूड प्रोसेसिंग व फॅशनसंबंधी नवनवीन कोर्सेस उपलब्ध करून दिला जाणार आहेत. तसेच लवकरच नर्सिंग कॉलेजही सुरू होणार आहे. फॅशन डिझायनिंग प्रशिक्षिका वृषाली नाचणकर यांनी सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमाला समिती सदस्य प्रसन्न दामले, बीसीए प्राचार्य स्नेहा कोतवडेकर, अक्षता तेंडुलकर, श्रद्धा आयरे यांच्यासमवेत प्राध्यापक, पहिल्या बॅचच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.