(चिपळूण /ओंकार रेळेकर)
तालुक्यातील आदर्श मित्र मंडळ पश्चिम वनेवाडी यांच्या १० मे रोजी व मुंबई क्रीडा मंडळ यांच्या दि. 11 रोजी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यासाठी स्व. रत्नू कुळे यांच्या जागेमध्ये क्रिकेटची धावपट्टी तयार करण्यात आली होती. आदर्श मित्र मंडळ पश्चिम वणेवाडी यांची क्रिकेट स्पर्धा आज १० ला होणार होती. मात्र काही समाजकंटक वृत्तीच्या लोकांनी रात्रीच ती धावपट्टी खोदून टाकली. यामुळे आदर्श असलेल्या बामणोली गावात असे कृत्य शोभनीय नाही. सर्वांनी या कृत्याचा निषेध केला आहे.
बामनोली गाव तसा कला, क्रीडा, आणि शिक्षण या क्षेत्रामध्ये नेहमीच आघाडी वरती आहे. आतापर्यंत अनेक वेळा स्पर्धा या गावात झालेल्या आहेत . सन 2023 मध्ये क्रिकेटच्या स्पर्धा सुद्धा दमदारपणे पार पडल्या. अशीच क्रिकेट स्पर्धा दि.१० मे रोजी आदर्श मित्र मंडळ पश्चिम वणेवाडी यांनी आयोजित केली आहे तर ११ मे रोजी मुंबई क्रीडा मंडळ बामणोली यांनी ४० वर्षावरील लोकांसाठी आयोजन केले आहे. यासाठी स्व. रत्नू कुळे यांच्या जागेमध्ये सामने खेळवले जाणार होते. तिथे सुंदर अशी धावपट्टी मेहनत घेत बनवण्यात आली होती. पाऊस पडला असून सुद्धा या खेळपट्टीसाठी खेळाडूंनी मेहनत घेतली होती.
दिनांक ९ मेच्या रात्री ११ वाजेपर्यंत ही धावपट्टी स्सुस्थितीत होती. मात्र त्यानंतर रात्रीच ही धावपट्टी खोदण्यात आली. जेणेकरून या स्पर्धा होऊ नये असा या अज्ञात खोडणाऱ्या इसमाचा हेतू असावा. सकाळी आदर्श मित्र मंडळ पश्चिम वनेवाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी आले असता ही धावपट्टी खोदल्याचे दृश्य पाहायला मिळाले तर त्यांना सुद्धा अचानक धक्का बसला, की हे कृत्य कोणी केले असेल? त्यानंतर त्यांनी काही गावातील लोकांना सूचित केले. पोलीस पाटील अमोल गमरे, माजी सरपंच सिताराम तांबे, सरपंच सुदेश गमरे, महादेव पवार, भाई कुळे आणि इतर लोकांच्या निदर्शनात बाब आणून दिली. अतिशय निंदनीय कृती आदर्श समजल्या जाणाऱ्या बामनोली गावामध्ये घडलेली आहे.
आदर्श मित्र मंडळ पश्चिम वणे वाडी व मुंबई क्रीडा मंडळ यांच्या स्पर्धा होऊ नये असाच धावपट्टी उकरून टाकणाऱ्या समाजकंटकाचा हेतू असला पाहिजे. आता हे एका व्यक्तीने काम केले नसून त्याच्यासोबत अनेक व्यक्ती होत्या का? हा प्रश्न सुद्धा अजूनही गुलदस्त्यातच राहिलेला आहे. मात्र जे कृत्य झालेआहे ते निंदनीय असून याचा सर्वांनी निषेध नोंदवला आहे. निश्चित याची चौकशी होणार आहे असे सांगितले जात आहे.
गावात शांतता नांदावी सलोखा नांदावा यासाठी प्रत्येक वाडीतील ज्येष्ठ सदस्य प्रयत्न करीत असतात. मात्र अशी कृती होत असेल तर निश्चितच कुठेतरी या एकतेला बाधा पोहण्याचा प्रयत्न होत आहे. दोन दिवस पाऊस पडून सुद्धा आदर्श मित्र मंडळाने खूप मेहनत घेतली होती. आणि स्पर्धेच्या दिवशीच सकाळी त्यांना हे दृश्य निदर्शनात आल्याने त्यांच्या मनात सुद्धा संतप्त भावना निर्माण होणे साहजिकच आहे. मात्र त्यांनी संयम ठेवत या गोष्टीचा खुलासा करण्यासाठी काही गावातील पुढाऱ्यांना ही गोष्ट लक्षात आणून दिली आहे.