खेड : खेड पोलिसांची काल मध्यरात्री गस्त चालू असताना दापोली मार्गावरील चिंचघर बौद्धवाडी बसस्टॉप जवळ पोलिसाना 6 जणांचा संशय आला. हे 6 जण 700 किलो गोमांस विकून चक्क पावणे दोन लाख रुपये कमावणार होते.
खेड पोलीस निरीक्षक निशा जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम, उपनिरीक्षक योगेश मोरे, पोलीस हवालदार येलकर व कोटकर यांनी या 6 जणांची चौकशी केली. मात्र चौकशी दरम्यान समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसानी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या वाहनांची चौकशी केली असता 700 किलो वजनाचे 1 लाख 72 हजार रुपये किमतीचे गोमांस आढळले. वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहनही पोलिसानी जप्त केले. या 6 जणांपैकी 3 जण हे मुंबईचे आहेत.
चंद्रशेखर किसनलाल तांबोळी (रा.गोवंडी शिवाजीनगर-मुंबई, मूळ रा. अहमदनगर), मुजाहिद (रा. मुंबई), चंद्या पालशेतकर व अन्य तिघांचा समावेश आहे. तिघेजण मुंबईतील असून त्यांची नावे अद्याप समजलेली नाहीत.