(मुंबई/किशोर गावडे)
दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक पारस पोरवाल (वय-57) यांनी राहत्या इमारतीच्या 23 व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (गुरुवारी ) सकाळी घडली आहे.
व्यवसायात झालेल्या आर्थिक तोट्यातून पारस पोरवाल यांनी आत्महत्या केली असल्याचे सूत्रांकडून समजते. या घटनेची माहिती मिळताच काळाचौकी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भायखळा येथे गुरुवारी सकाळी ही आत्महत्येची घटना घडली आहे. पारस पोरवाल यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरु केला. यात पोलिसांना पोरवाल यांनी लिहिलेली एक सुसाइड नोट सापडली आहे. त्यानुसार पोरवाल यांनी व्यवसायात झालेल्या आर्थिक तोट्यातून जीवन संपविण्याचे हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे.
पारस पोरवाल यांनी इमारतीच्या टेरेस वरुन उडी मारुन आत्महत्या केली. त्यांच्या जिमच्या खोलीत एक सुसाईड नोट सापडली असून त्यामध्ये आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, कोणाचीही चौकशी करु नये, असे लिहिलेले आहे. नातेवाईकांनी त्यांचे अक्षर ओळखले आहे. त्यांचाही कुणावर संशय नसल्याचे नातावेईकांनी पोलिसांना सांगितले.