(राजापूर)
राजापूर सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक स्वप्नील बावधनकर यांना शासनाचा यावर्षीचा आदर्श कर्मचारी पुरस्कार जाहिर झाला आहे. बांधकाम विभागातील राज्यातील विविध संवर्गातील ३७ अधिकारी व कर्मचारी यांना यावर्षीचा आदर्श कर्मचारी पुरस्कार जाहिर झाला असून त्यात राजापूरच्या बावधनकर यांचा समावेश आहे. गुरूवारी १५ सप्टेबर रोजी अभियंता दिनाचे औचित्य साधून या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. भारतरत्न विश्वेश्वरय्या यांचा १५ सप्टेंबर हा जन्मदिवस दरवर्षी “अभियंता दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने या विभागात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अभियंत्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येते.
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत रस्ते, पूल, विविध विभागांच्या इमारती व इतर सार्वजनिक बांधकामे करण्यात येतात. इमारती/ पुलांची संकल्पना तयार करुन व इतर माध्यमांचा म्हणजे संगणकाचाही उपयोग करुन संकल्पनाचित्रे बनवताना तसेच, सार्वजनिक इमारतींची विद्युतीकरणाची कामे करताना व प्रकल्प राबविताना जे तांत्रिक कौशल्य पणाला लागते आणि ज्यामुळे अशा अभियंत्यांची सेवा समाजाला भविष्यात फायद्याची ठरते, अशा अभियंत्यांचे प्रशासकीय तसेच तांत्रिक कौशल्य लक्षात घेऊन त्यांचा वैयक्तिक पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो.
मुळचे राजापूर शहरातील रहिवाशी असलेले स्वप्नील बावधकर हे बांधकाम विभागात सेवेत आहेत. राजापूर तालुक्यात पाचल विभागात ते कार्यरत आहेत. एक कर्तव्यतत्पर अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. ओणी पाचल विभागात काम करताना आपदकालीन परिस्थितीत तसेच नैसर्गिक आपत्ती काळात बावधनकर यांनी अत्यंत चांगली व नियोजनबध्द कामगिरी करत या विभागाची शान राखली आहे. ओणी पाचल अणुस्कूरा घाट रस्त्याची देखभाल दुरूस्ती कामात त्यांचे महत्वाचे योगदान आहे. या ठिकाणी जातीनीशी प्रसंगी रात्री अपरात्री काम करून त्यांनी हा मार्ग कायम वाहतुकीसाठी सुरक्षित व सुस्थितीत ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे आणि कर्तव्य भावनेतुन काम करणारे अभियंता अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यांच्या या कार्यपध्दतीमुळे त्यांनी या भागातील जनतेतही आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या या चांगल्या कार्याची दखल घेत शासनाने त्यांना यावर्षीचा आदर्श कर्मचारी पुरस्कार जाहिर केला आहे.
गुरूवारी 15 सप्टेंबर रोजी सकाळ १० वाजता मुंबईत षण्मुखानंद सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
त्यांना यावर्षीचा शासनाचा आदर्श कर्मचारी पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.