(नवी दिल्ली)
इमर्जिंग आशिया कप २०२३ च्या उपांत्यफेरीत भारताच्या युवा ब्रिगेडने बांगला देशचा अ चा पराभव केला. बांगला देश अ संघाचा पराभव करत भारताने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारत अ संघाने बांगलादेश अ संघाचा ५१ धावांनी पराभव केला. भारत अ संघाने प्रथम फलंदाजी करताना २१२ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरदाखल बांगला देशचा संघ १६० धावांपर्यंत मजल मारु शकला. भारतीय संघ आता फायनलमध्ये पोहचलाय. आता भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये रविवारी फायनलचा थरार रंगणार आहे. इमर्जिंग टीम्स आशिया चषकातील भारत-पाकिस्तान फायनल सामना रविवारी (२३ जुलै) दुपारी २ वाजेपासून सुरु होईल. हा सामना कोलंबोच्या आर.प्रेमदासा स्टेडियम खेळवला जाईल.
पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तानने श्रीलंका संघाचा साठ धावांनी पराभव करत फायनलमध्ये प्रवेश मिळवला. बांगला देशविरोधात भारताच्या निशांत सिंधु याने ५ विकेट घेतल्या. भारत अ संघाने प्रथम फलंदाजी करताना ४९.१ षटकात २११ धावांपर्यंत मजल मारली. यश धुल याने कर्णधारपदाला साजेशी फलंदाजी केली. यश धुल याने ८५ चेंडूत ६६ धावांची खेळी केली. या खेळीत यश धुल याने सहा चौकार लगावले. अभिषेक शर्मा याने ६३ चेंडूत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३४ धावांची खेळी केली. सलामी फलंदाज साई सुदर्शन याने २४ चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने २१ धावांची खेळी केली. रियान पराग याला मोठी खेळी करता आली नाही. त्याला फक्त १२ धावा करता आल्या. निकिन जोस याने १७ धावांचे योगदान दिले.