(राजापूर)
राजापूर आगारातील वाहक प्रताप माने व चालक सतिश गायकवाड यांनी प्रसंगावधान दाखवून खिशातील मोबाईल चोरटयाला त्वरीत पकडले असून त्यांना पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. या मोबाईल चोरटयामुळे आता रत्नागिरी, पाचल व लांजा येथील काही दिवसापुर्वी झालेल्या मोबाईल चोरीचा छडा लागण्याची शक्यता आहे. आगारातील सीसी फुटेजमुळे चोरटयाला पकडण्यात यश आले आहे.
प्रताप माने हे तालुक्यातील आजिवली गावचे रहीवासी असून ते राजापूर आगारात वाहक म्हणून कार्यरत आहेत. शुकवार दि. 21 रोजी नेहमी प्रमाणे आपली डयूटी संपवून कुडाळ बसने घरी जाण्यासाठी निघाले. बसमध्ये बसल्यानंतर त्यांच्या लक्षात आले,आपला मोबाईल नाही. त्यांनी गाडीमध्ये शोध घेतला मात्र त्यांना मोबाईल न सापडल्याने त्यांनी चौकशी कक्षात राहीला का पाहीले. मात्र इथेही न सापडल्याने त्यांनी त्वरीत आगारातील सीसी फुटेज केबिनमध्ये जाऊन फुटेच तपासण्याची मागणी केली. यावेळी फुटेज तपासले असताना त्यांच्या लक्षात आले की, आपला मोबाईल हा गुलाबी कलर घातलेल्या व्यक्तीने काढला आहे. त्वरीत त्यांनी आपले साथीदार सतिश गायकवाड यांना घेऊन तो ज्या दिशेने गेला तिकडे जात शोध घेतला. यावेळी आगाराच्या बाहेरच ती व्यक्ती सापडली. यावेळी त्याच्या सोबत अन्य साथीदारही होता. मोबाईल चोराला पकडण्यात माने व गायकडवाड यांना यश आले, मात्र त्याचा साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला.
पकडण्यात आलेली व्यक्ती ही आंध्रप्रदेशातील विजयवाडा मंगलगिरी येथील असुन त्यांने आपले ना महेश अरविंद पोसलरू (37) असे पोलीसांना सांगितले. त्याला तेलगू भाषा अवगत असून तो हिंदी बोलत नाही. मात्र येथील आगारातील कर्मचारी बालाजी आढाव यांना वेगवेंगळया 10 भाषा येत असल्याने त्यांनी त्याची सर्व माहीती विचारून घेत पोलीसाना दिली. दरम्यान पकडण्यात आलेल्या पोसलरू यांनी आपल्या मोबाईलमधील सर्व डाटा उडवून टाकला असल्याने व भाषेचा प्रश्न उद्भवत असल्याने पळून गेलेल्या साथीदाराला पकडण्यासाठी पोलीसांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
या मोबाईल चोरी करणाऱ्या या व्यक्तीला पकडण्यात आले असल्याने काही दिवसापुर्वी रत्नागिरी, लांजा व पाचल शहरामध्ये झालेल्या मेंबाईल चोरीचा छडा लागण्याची शक्यता आहे. या संदर्भात प्रताप माने यांनी राजापूर पोलीस स्थानकांत तकार दिली असून याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक शिल्पा वेंगुलेकर करीत आहेत.