(रत्नागिरी)
कोरोना प्रादुर्भाव व त्यानंतर कर्मचाऱ्यांचा चा बंद या कालावधित एसटीच्या बसेस अनेक महिने वापराविना कार्यशाळेत, आगरातून उभ्या होत्या. त्या कालावधीत त्यांची दुरुस्ती करण्यात आली नव्हती. तर संप संपल्यानंतर सुरुवातीच्या काळात भारमान नसल्याने काही निवडक मार्गावरील फेऱ्या सुरु झाल्या. त्यानंतर एसटीचे वेळापत्रक नियमित करण्याचे काम एसटीचे प्रशासन करत होते. सध्या शाळा सुरु झाल्याने एसटी बसेसच्या मागणीत वाढ होत असताना आता टायरचे नवे संकट रत्नागिरी विभागासमोर उभे राहिले आहे. नवीन टायर न आल्याने एसटी बसेस कार्यशाळेत उभ्या करुन ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
परिवहन मंत्री ना. अनिल परब पालकमंत्री असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातच टायर अभावी तब्बल ९० बसेस विभागीय कार्यशाळेत उभ्या आहेत. एका बाजूला एसटीचे विस्कळीत झालेले वेळापत्रक नियमित करण्याचे काम सुरु आहे. मात्र या टायर संकटामुळे स्थानिक प्रशासन हवालदिल झाले आहे.
दि. १५ जून पासून शाळा सुरु झाल्यानंतर ग्रामीण भागासह शहरी भागातही एसटी बसेसच्या मागणीत वाढ झाली आहे. लांब पल्ल्याच्या तब्बल १८ ते २० बसेस ग्रामीण भागासाठी वळविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात दररोज एसटीच्या ४ हजार ५०० फेऱ्या नियमित धावात होत्या. कोरोना कालावधीपासून त्यामध्ये कपात झाली. तर कर्मचारी बंदच्या कालावधीत एसटी सेवा पुर्णत: ठप्प झाल्याने, आता जूनमध्ये वेळापत्रक पुन्हा नियमित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात ३ हजार ८०० फेऱ्सुया सुरु आहेत.
शाळा सुरु झाल्यानंतर ग्रामीण व शहरी भागात ३५० फेऱ्यांची मागणी अतिरिक्त आली होती. त्यातील बहुतांश भागात गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. काही गाड्याचे मार्ग बदलून त्या विद्यार्थी वाहतुकीसाठी वळविल्या जात आहेत. जिल्ह्यातील सर्व मार्गांवर विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही. याची काळजी एसटी प्रशासना घेत असल्याचे एसटी प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शहरी भागात सन २०१९ ला ४३ फेऱ्या सुरु होत्या. आता पुन्हा ४० फेऱ्या पुर्ववत करण्यात एसटीला यश आले आहे. विद्यार्थी संख्येनुरुप काही मार्गावर फेऱ्या वाढविण्याचे काम सुरु असल्याचे एसटी प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र नवीन टायर न आल्याने काही एसटी बसेस कार्यशाळेत उभ्या करुन ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.