(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील बसणी येेथे शनिवारी सकाळी 10.30 वाजता दोन एस टी बसची धडक झाली होती. या अपघातप्रकरणी एका बस चालकावर ग्रामीण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र रमेश कदम (रा.रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित एसटी चालकाचे नाव आहे.
दरम्यान शनिवारी झालेल्या या अपघातात तिघेजण जखमी झाले होते. गुरव (रा.लांजा, रत्नागिरी), पुष्पा कारंडे (रा.ठाणे) आणि उत्कर्षा वाडेकर (रा.ऐरोली नवी मुंबई) अशी तिघांची नावे आहेत. या बाबत बालाजी नागुराव कोळी (43, मुळ रा.देवराली कळंब जि.उस्मानाबाद सध्या रा.रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे.
कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते आपल्या ताब्यातील एसटी बस घेउन रत्नागिरी ते गणपतीपुळे असे जात होते. त्याच सुमारास जितेंद्र कदम आपल्या ताब्यातील एसटी बस घेऊन वरवडे, नेवरे ते रत्नागिरी असा भरधाव वेगाने येत होता. या दोन्ही एसटी बस बसणी येथील नागझरी स्टॉपजवळ आल्या असता जितेंद्रचा एसटीवरील ताबा सुटला आणि त्याने समोरुन येणार्या एसटीला जोरदार धडक दिली. यात तिघेजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी अधिक तपास पोलिस हवालदार गायकवाड करत आहेत.