(रत्नागिरी)
सव्वा तीन वर्षांपूर्वी राजापूर तालुक्यातील पांगरे गावमळावाडी येथील पायवाटेवरुन घरी जाणाऱ्या तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने मंगळवारी ७ वर्षे सश्रम कारावास आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सुरेंद्र सुरेश बाईत ( २२, रा. कोंड्ये तर्फेसौंदळ मधलीवाडी, राजापूर ) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीतेने राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानूसार , पिडीत तरुणी ही त्यावेळी १२ वीमध्ये शिकत होती. २५ सप्टेंबर २०१९ रोजी कॉलेजमध्ये रांगोळी स्पर्धा असल्याने ती सकाळी कॉलेजमध्ये जाउन दुपारी घरी परत जात होती. ती पायवाटेने घरी जात असताना त्याच ठिकाणी गुरे चरवण्यासाठी गेलेल्या सुरेंद्र बाईतने पिडीतेला पाहिले. ती एकटीच असल्याची संधी साधत सुरेंद्रने तिचे दोन्ही हात धरुन पायवाटेजवळ असलेल्या जंगलमय भागात फरफटत नेले. त्याठिकाणी पिडीतेशी अश्लील वर्तन करत तिचा गळा दाबला. ठार मारण्याची धमकी देत तिच्या शरिरावर ओरबाडून तसेच चावे घेऊन जखमा करत तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता.
याप्रकरणी पिडीतेने राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. राजापूरचे तत्कालीन पोलिस निरीक्षक एस. एम. वालावलकर यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात आरोपीला ७ वर्ष सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.