बलाढ्य कुणबी समाजाचा आज पर्यंत केवळ राजकारणासाठी राजकारण्यांनी वापरच केला. यात समाजाच्या तीन पिढ्या गेल्या, तरी या समाजाला न्याय मिळाला नाही, अशी घणाघाती टीका जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांनी आज (४ फेब्रुवारी २०२३ ) रत्नागिरीतील विवेक हॉटेल येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. वंचित बहुजन आघाडीने याविषयी पुढाकार घेत २५ फेब्रुवारी रोजी चिपळूण तालुक्यातील रामपूर येथे कुणबी समाज उन्नत्ती हक्क परिषद आयोजित केल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष (उत्तर) अण्णा जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कुणबी समाज उन्नत्ती हक्क परिषद होणार आहे. परिषदेची माहिती देताना जिल्हाध्यक्ष विकास जाधव म्हणाले, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १६ मे १९३८ मध्ये खेडींच्या हत्ती माळावर घेतलेल्या खोतीविरोधी परिषदेत अनेक मागण्या केल्या. त्यातील अनेक मागण्या आजही प्रलंबित आहेत. राजकीय पक्ष व कोकणातील नेत्यांनी त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले. परिणामी त्याचा फटका सामान्य कुणबी समाजाला बसत आहे. एकेकाळी याच समाजाचे जिल्ह्यात सर्व आमदार होते. परंतु, आज हा बलाढ्य समाज कूळ- कायद्यामुळे विकलांग झाला आहे, असे जाधव म्हणाले.
गेली दोन वर्षे उत्तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडी विविध मुद्दयावर काम करत आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यातून कोकणातील कूळ वहिवाटीचा मुद्दा अनेकांना त्रासदायक ठरल्याचे जाणवते आहे. कोकणातील कुणबी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी आवाज उठवला जाणार आहे.
केवळ कूळ वहिवाटीच्या कायद्यांतर्गत सर्वच बाबतीत ओबीसींना ५२ टक्के आरक्षण मिळाले पाहिजे. तसेच स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार, आंबा, काजूच्या नुकसान भरपाईत कुळांना सामावून घेण्यात यावे. या मागणीसाठी परिषदेत आवाज उठवला जाणार आहे.
यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अविनाश आदवडे, रत्नागिरी (दक्षिण) जिल्हाध्यक्ष रुपेंद्र जाधव, भा. बौ. म. जिल्हाध्यक्ष अनंत सावंत, तालुका महासचिव मुकुंद सावंत, प्रवीण जाधव, संदीप पवार, राजेश जाधव आदी उपस्थित होते.
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy. I Agree
महानगरांसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. बातम्यांसोबत संग्राह्य माहितीचा खजानाही !