(संगलट / वार्ताहर)
खेड येथील आयडीबीआय बँकेत ३६, ३५,५८० /- रुपयांचे बनावट सोन्याचे दागिने / अलंकार तारण ठेवून कर्ज घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी बँकेच्या सोनारासह १० जणांविरोधात २७ डिसेंबर रोजी गुन्हा रजिस्टर नंबर ३८१ /२०२३ , भा. द. वि. सं. कलम ४०९ , ४२० ,३४ अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १४ फेब्रुवारी २०२२ ते दिनांक ८ डिसेंबर २०२३ या मुदतीत घडली आहे. याबाबतची फिर्याद जितेंद्र नारायणदास शाह यांनी येथील पोलीस स्थानकात दाखल केली आहे.
प्रदीप रामचंद्र सागवेकर ( बँकेचे सोनार ), गौरव विष्णू सागवेकर, सौ. नीलिमा निलेश सागवेकर, सागर रमेश सागवेकर, निलेश रमेश सागवेकर, सुधीर परशुराम राणीम, सौ. अक्षता सुधीर राणीम, समीर रघुनाथ म्हसलकर ( सर्व रा. पेठवाडी, ता. खेड ), राहुल अनंत सकपाळ, कमलाकर हरिश्चंद्र पालकर अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या दहा आरोपींनी खेड येथील आयडीबीआय बँकेत सोन्याचे दागिने, अलंकार गहाण ठेऊन सोने तारण कर्ज मिळण्याकरिता अर्ज केला. सोन्याचे दागिने अलंकार खरे असल्याचे भासवून बनावटी दागिने बँकेत सोने तारण कर्जाकरिता गहाण ठेवत असताना बँकेतील करारनामा करून नियुक्त केलेले सोनार आरोपी प्रदीप रामचंद्र सागवेकर यांनी आणि अन्य नऊ जणांनी सोने तारणकरीता गहाण ठेवलेले दागिने हे बँकेचे सोने परीक्षक म्हणून तपासून हे दागिने बनावट आणि खोटे असल्याचे माहीत असून ते खरे असल्याचे भासवून तसे प्रमाणपत्र देऊन आरोपी यांना गैरलाभ व्हावा व बँकेची गैरहानी व्हावी या उद्देशाने अप्रामाणिकपणे ३७, ३५, ५८० /- रुपयांचे बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.