( चिपळूण / प्रतिनिधी )
तालुक्यातील वाणीआळी येथे तलाठ्याने शासकीय अभिलेखावर बनावट सातबारा तयार करून एकाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तलाठ्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजित नेताजी राठोड (तलाठी कार्यालय चिपळूण), अजित घोरपडे, मुरलीधर अनंत घोरपडे (दोन्ही रा. पवारआळी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद कल्पेश खातू (वाणीआळी, चिपळूण) यांनी पोलिस स्थानकात फिर्याद दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तलाठी अजित राठोड याने आपल्या पदाचा गैरवापर करून अजित घोरपडे, मुरलीधर घोरपडे या दोघांच्या साथीने बनावट 7/12 उतारा तयार केला व कल्पेश यांची आर्थिक फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कल्पेश यांनी पोलिस स्थानकात धाव घेतली. मात्र तिथेही तलाठी अजित राठोड, अजित घोरपडे, मुरलीधर घोरपडे यांनी तक्रार मागे घेण्यासाठी धमकी दिली. याप्रकरणी कल्पेश यांनी पोलिस स्थानकात फिर्याद दाखल केली. भादवीकलम 420, 469, 465, 471, 506, 120 (ब), 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.