(मुंबई)
२०१६ मध्ये मुंबईतील हॉटेल एअरपोर्ट मेट्रोमध्ये कुख्यात गुंड संदीप गडोले हा कथित बनावट चकमकीत मारला गेला होता. या चकमकप्रकरणी गेली ७ वर्षे तुरुंगात असलेली आरोपी मॉडेल दिव्या पाहुजा हिला अखेर मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती पी.डी.नाईक यांनी एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला आहे.
आरोपी मॉडेल दिव्या हिने ही चकमक घडवून आणण्यासाठी संदीप गडोले याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून गुडगाव पोलिसांना मदत केल्याचा आरोप दिव्या हिच्यावर मुंबई पोलिसांनी ठेवला होता. या आरोपाखाली तिला १४ जुलै २०१६ रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून ती तुरुंगात आहे. तिने अलीकडे आपल्या जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.या याचिकेवर झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, ‘अर्जदार एक महिला आहे आणि ती सुमारे ७ वर्षांच्या कालावधीसाठी कोठडीत आहे आणि पुढे लवकरच हा खटला पूर्ण होण्याची शक्यता नाही. घटनेच्या वेळी अर्जदाराचे वय सुमारे १८ वर्षे होते. या सर्व तथ्यात्मक बाबींचा विचार करून, अर्जदाराला काही अटींवर जामीन दिला जाऊ शकतो.’