(रत्नागिरी)
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. बदल्यांसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत संपुष्टात आली असून बदली पात्र शिक्षकांची यादी उद्या १६ ऑगस्टला बाहेर पडणार आहे. आंतरजिल्हा बदलीने जाण्यासाठी जिल्ह्यातील अनेक प्राथमिक शिक्षक दरवर्षी प्रयत्न करत असतात. आतापर्यंत झालेल्या भरती प्रक्रियेत परजिल्ह्यातील शिक्षकांच्या नियुक्त्या झाल्यामुळे पाच वर्षानंतर ते आपल्या गावाकडे परतात.
रिक्त पदांची संख्या अधिक असल्यामुळे आंतरजिल्हा बदली प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती. मात्र शासनाकडून रत्नागिरी जिल्ह्यासाठी पोर्टल खुले करण्यात आले. दि. ११ ऑगस्टपर्यंत बदलीसाठी इच्छुक शिक्षकांनी ऑनलाईन अर्ज भरले. जिल्ह्यातील सव्वातीनशे शिक्षकांनी आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज सादर केल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. अर्ज सादर केले असले तरीही पात्र ठरणाऱ्या शिक्षकांची यादी दि. १६ ऑगस्टला जाहीर केली जाणार आहे. दि. १३ ऑगस्टला ही यादी जाहीर केली जाणार होती. मात्र तीन दिवस मुदत पुढे ढकलण्यात आली आहे, रत्नागिरी जिल्ह्यात रिक्त पदांची संख्या १७ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे बदलीसाठी पात्र ठरणाऱ्या शिक्षकांना परवानगी देणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सध्या अनेक शाळांवर बदलीने शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. आंतरजिल्हा बदलीने शिक्षकांना सोडण्यात आले, तर रिक्त पदांची संख्या आणखी वाढणार आहे. जिल्हा परिषदेच्या पावणेतीन हजार शाळा असून त्यात सव्वा सहा हजार शिक्षकांची पदे मंजूर आहेत. ९०४ पदे रिक्त असून आंतरजिल्हा बदलीमुळे त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.