(मुंबई)
राजकारण एका बाजूला आणि नातेसंबंध एका बाजूला अशी राजकीय नेत्यांबाबत घडणारी अनेक उदाहरणे आपण पाहतो, एकतो व बघतोही. असेच एक उदाहरण मुंडे बहिण भावात घडल्याचे समोर आले आहे. राजकीय पटलावर एकमेकांवर आसूड ओढणारे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे संकटकाळात एकमेकांच्या सोबत असतात, याची पुन्हा प्रचिती आली आहे. पंकजा मुंडे या आपला भाऊ धनंजय मुंडेंच्या भेटीला ब्रीच कॅण्डीत दाखल झाल्या. काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे अपघातात जखमी झाले आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, माजी मंत्री धनंजय मुंडे यांची मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
पंकजा मुंडे या भेटीनंतर बोलताना म्हणाल्या की, मी माझ्या भावाची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आले होते. त्यांची तब्येत बरी आहे. मी बहीण आहे आणि मागेदेखील धनंजय मुंडे अॅडमिट होते, तेव्हा मी भेटायला गेले होते. मी तर बहीणच आहे आणि सर्वच राजकीय नेतेमंडळी एकमेकांना भेटतात, ही राजकीय संस्कृती आहे, असे त्या म्हणाल्या.
धनंजय मुंडे यांच्या अपघातानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांच्या छातीमध्ये किरकोळ मार असून ते सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या तब्येतीबाबत कोणत्याही प्रकारच्या काळजीचे कारण नसल्याचे नातेवाईकांकडून कळविण्यात आले आहे.