( प्रतिनिधी / लांजा )
पावसाळ्यात उत्खनन करण्यास शासनाने बंदी घातली असतानाही लांजा तालुक्यातील सापुचेतळे परिसरात विनापरवाना जांभ्या दगडाचे उत्खनन केल्याप्रकरणी महिलेला 2 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तहसीलदार प्रमोद कदम यांनी लांजातील वाडीलिंबू येथील विदिशा पावसकर यांना २ लाख १२ हजार १०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
विदिशा विश्वास पावसकर यांनी अनधिकृतपणे जांभ्या दगडाचे उत्खनन केल्याची बाब महसूल प्रशासनाच्या निदर्शनास आली होती. याबाबत प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यांच्याकडे परवाना नसल्याचे लक्षात आले . पावसकर यांनी विनापरवाना १४ ब्रास जांभा दगडाचे उत्खनन केल्याचे आढळून आले होते . विनापरवाना उत्खनन केल्याप्रकरणी तहसीलदार कदम यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ नुसार पावसकर यांनी उत्खनन केल्याप्रकरणी दंड ठोठावला आहे. यामध्ये १४ ब्रास माती उत्खनन केल्याबाबत प्रतिब्रास बाजारमूल्य दंड ३००० चे प्रमाणे १४ ब्रासचे ४२ हजार रुपये आणि त्याचे पाचपट म्हणजेच २ लाख १० हजार आणि प्रतिब्रास जांभा दगड रुपये १५० प्रमाणे १४ ब्रासचे २१०० असा एकूण २ लाख १२ हजार १०० रुपये दंड ठोठावला .