(मुंबई)
महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय अभूतपूर्व भूकंप झाला असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी केलेल्या बंडाळीमुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. फोडाफोडीच्या राजकारणात काँग्रेसच्या आमदार मातोश्रीवर पोहोचला असून महाविकास आघाडीत कुरघोडी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. प्रतिभा धानोरकर या वरोरा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन झाल्यामुळे या मतदारसंघात आता पोटनिवडणूक होणार आहे.
या लोकसभा पोटनिवडणुकीत प्रतिभा बाळू धानोरकर ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं बोलले जात आहे. त्यामुळे त्या आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असल्याचंही समजते. दिवंगत खासदार बाळू धानोरकर आणि त्यांचे कुटुंबिय हे 2019 च्या आधी शिवसेनेत होते. त्यामुळे धानोरकर कुटुंब आता पुन्हा शिवसेनेत पक्ष प्रवेश करत असल्याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे.