(पुणे)
पुण्यातील एका वृत्त समुहाने घेतलेल्या मुलाखतीत 20 जून रोजी एकनाथ शिंदे राज्याबाहेर कसे पडले याचा घटनाक्रम अजित पवार यांनी उलगडला. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंडखोरी करुन राज्याला मोठा धक्का दिला. एवढ्या मोठ्या संख्येने शिवसेनेचे आमदार राज्याबाहेर जात होते, मात्र, याची कुणालाच कल्पना नव्हती. शिंदे गटाच्या गाड्या राज्याबाहेर जात असताना कमालीची गुप्तता बाळगण्यात आली. हे सगळं कसं घडलं? याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नेमका घटनाक्रम सांगितला.
शिंदेंच्या बंडखोरीवर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, एकनाथ शिंदे बंडखोरी करणार आहेत. याची कुणकुण आमच्यासह त्यांच्या वरिष्ठांना लागली होती. याबाबत मीही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातले होते. मात्र, आमच्या हातात राज्य असूनही काही बाबी इतक्या व्यवस्थित घडल्या की, आम्ही काहीच करु शकलो नाही. खरं तर, ठाणे जिल्ह्यात कोण अधिकारी असावेत? हे ठरवण्याचा सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना दिला होता. त्यामुळे तेथील पोलीस आयुक्त, ठाण्याचे आयुक्त किंवा तेथील सहा नगरपालिकांचे आयुक्त, ग्रामीणचे एसपी वगैरे नेमण्याचा सगळा अधिकार एकनाथ शिंदे यांना दिला होता.
अजित पवार पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे 20 जून रोजी जेव्हा बाहेर पडले, तेव्हा त्यांनीच नेमलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना सुरतला सुरक्षितपणे पोहोचवण्याचं काम केलं. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले की, शिंदे गटाच्या गाड्या जिथे असतील तिथून त्या गाड्या परत वळवा आणि त्यांना मातोश्रीवर आणा. पण अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर उद्धव ठाकरेंनी सही केली असली तरी त्या सह्या करुन घेण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले होते. त्यामुळे सगळे अधिकारी शिंदे यांच्याशी एकनिष्ठ राहिले. शिंदे गटाच्या सगळ्या गाड्या पद्धतशीर व सुखरूप बाहेर पडल्यानंतर अधिकारी म्हणाले, अजून कुठे काहीच दिसत नाही. मात्र त्यावेळी सर्व घडून गेलं होत. त्यानंतर पुढे सुरत-गुवाहाटी-गोवा हे सगळ्यांना माहितच आहे, असं अजित पवार म्हणाले.