(देवरूख / सुरेश सप्रे)
कोकण रेल्वेचे शिल्पकार नाथ पै, मधू दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांना अभिवादन करण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या यात्रेनिमित्त आमदार कपिल पाटील देवरुखमध्ये येणार आहेत. जदयूच्या वतीने संपूर्ण कोकणात आयोजित करण्यात येणाऱ्या या यात्रेच्या पूर्वतयारीसाठी देवरूख मध्ये हॉटेल पार्वती पॅलेस येथे बैठक पार पडली. निवडक कार्यकर्त्यांच्या बैठकीला कुणबी समाजाचे नेते सुरेश भायजे, जदयू नेते हिराजी पाटील, राजा कांदळकर, सचिन बनसोडे यांनी मार्गदर्शन केले. बैठकीला माजी सभापती नारायण भुरवणे, मुरादपूरचे माजी सरपंच अनिल बांडागळे, माळवाशीचे माजी सरपंच विष्णू सावंत, निवेचे उपसरपंच अमोल जाधव, हातीवचे रणजित कदम, इम्रान साटविलकर, माळवाशीचे रमाकांत सावंत, दीपक खंडागळे, विजय खंडागळे आदी उपस्थित होते. या बैठकीच्या आयोजनात जदयू संगमेश्वर तालुका संघटक मोईन साटविलकर यांनी अभिवादन यात्रेची भूमिका स्पष्ट केली.
बॅ. नाथ पै, प्रा. मधू दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस हे कोकण रेल्वेचे आणि त्यामुळे झालेल्या कोकणाच्या विकासाचे शिल्पकार आहेत. नाथ पै आणि मधू दंडवते यांचे यंदा जन्मशताब्दी वर्षही आहे. त्यानिमित्ताने या तिघांना अभिवादन करण्यासाठी जनता दल (युनाइटेड) च्या वतीने अभिवादन यात्रा काढण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने कोकण विकासाचे मॉडेल मांडणे, कोकणचे प्रश्न, पर्यावरण, बेरोजगारीचं संकट समजून घेणे, समाजवादी विचारांच्या लोकांना एकत्र करणे आणि त्यातून जनता परिवाराचे पुनर्गठन करणे असा प्रयत्न असणार आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली, असं जदयू संगमेश्वर तालुका समन्वयक विनय खेडेकर यांनी यावेळी सांगितलं.