(नवी दिल्ली)
सर्वसामान्यांचा एखादा हप्ता थकला तर, बँकेचे लोक घरी तर येणार नाहीत ना, या चिंतेने सामान्य माणूस बेजार होतो. बँकही लगेच कारवाई करून त्यांच्याकडून लवकरात लवकर पैसे वसूल करते. मात्र, दुसरीकडे गेल्या ७ वर्षात बँक घोटाळे किंवा फसवणुकीतून देशाचे अपार नुकसान झाले आहे. कारण देशात रोज १०० कोटी रुपयांचे नुकसान बँक घोटाळ्यातून झाल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे.
सर्वाधिक बँक घोटाळे किंवा फसवणुकीच्या घटना महाराष्ट्रात झाल्या आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईचा यात प्रामुख्याने समावेश आहे. बँक घोटाळा किंवा फसवणुकीच्या एकूण रकमेपैकी सुमारे ५० टक्के घोटाळे एकट्या महाराष्ट्रात झाले आहेत. त्यापाठोपाठ दिल्ली, तेलंगणा, गुजरात आणि तामिळनाडूचा क्रमांक लागतो. २०२१-२२ या वर्षात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भारत भरातील शाखांमध्ये ४ हजार १९२ कर्मचा-यांनी ७ हजार कोटींचे घोटाळे केल्याची माहिती आरटीआय अंतर्गत देण्यात आली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी ही माहिती मागितली होती. या घोटाळ्यात १२१ कर्मचा-यांनी २२६ कोटींचे घोटाळे केल्याचे समोर आले आहे. या शिवाय वेगवेगळ्या कारणांनी स्वेच्छानिवृत्ती घेणारे, राजीनामा, बडतर्फ कर्मचा-यांची संख्याही मोठी आहे. २०१७-१८ मध्ये एकूण ४४४३, २०१८-१९ मध्ये १७५४, २०१९-२० मध्ये १३३०, २०२०-२१ मध्ये ९१६ आणि २०२१-२२ मध्ये १२७७ अशा एकूण ९७२० कर्मचा-यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. १२१४ जणांना अनेक कारणांनी बडतर्फ करण्यात आले. २०१७-१८ मध्ये एकूण २३३२, २०१८-१९ मध्ये १५७७, २०१९-२० मध्ये २४५०, २०२०-२१ मध्ये २०५९ आणि २०२१-२२ मध्ये २३८६ अशा एकूण १०,८०४ कर्मचा-यांंनी राजीनामा दिला.