( मुंबई )
डेप्युटी चीफ लेबर कमिशनर यांनी तडजोडीसाठी बोलावलेली बैठक निष्फळ ठरल्याने बँक ऑफ महाराष्ट्रचा देशव्यापी संप येत्या शुक्रवारी (दि. २७) असे सांगितले गेले आहे. मुख्यत: बँकेची नोकरभरती अनेक वर्षे झाली नसल्याच्या प्रश्नावर बँकेतील कर्मचारी आणि अधिकारी संघटनांनी ही संपाची हाक दिली आहे.
त्यांच्या युनायटेड फोरम ऑफ महाबँक युनियनतर्फे हा संप पुकारण्यात आला आहे. गेल्या दहा वर्षात बँकेचा व्यवसाय अडीच पटीने वाढला, ४५० नवीन शाखा उघडल्या. पण कर्मचा-यांची संख्या २० टक्के कमी झाली. मृत्यू, निवृत्ती, राजीनामे यामुळे रिकाम्या झालेल्या जागादेखील भरल्या नाहीत.
अशा स्थितीत कर्मचा-याना जास्त वेळ काम करावे लागते, सुटीच्या दिवशी कामावर यावे लागते, रजा घेता येत नाहीत. त्यामुळे कर्मचा-यांना कौटुंबिक जबाबदा-या पार पाडणे अशक्य झाले असून या सगळ्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत असल्याचा दावा संघटनेच्या पत्रकात करण्यात आला आहे.
अपु-या कर्मचारी संख्येमुळे ग्राहक सेवा देता येत नसल्यामुळे बँकेच्या व्यवसायावरदेखील त्याचा नकारात्मक परिणाम दिसत आहे. तक्रारी वारंवार मांडूनही बँक व्यवस्थापनाने प्रतिसाद न दिल्यामुळे संपाची हाक देण्यात आली आहे. संपाच्या दिवशी बँकेतील कर्मचारी व अधिकारी वर्गाने शाखेसमोर निदर्शने करावीत असे आवाहन युनायटेड फोरम ऑफ महाबँक युनियनच्या वतीने निमंत्रक विराज टिकेकर आणि सह निमंत्रक धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे.