(रत्नागिरी)
ग्रामीण बँकेची २५ लाखांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात लिंगराज लकाप्पा जाधव ( वय ४९), उत्तरेश्वर मनोहर मुंढे (६३), उद्धव तुकाराम मुंढे (७१), नजीर मिरासाहेब बारमीर (७१), अलताब गुलाब शेख, सुदर्शन धनचंद्र चौगुले (सर्व रा. कोल्हापूर) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना १८ ते २३ मे २०२३ या कालावधीत घडली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित लिंगराज जाधव यांनी ग्रामीण बैंक शाखा येथून १६ लाख ४० हजारांची रक्कम कर्जावर घेतली. यानंतर कुवारबाव येथील मयुरेश रेसिडेन्सी या इमारतीमधील निवासी सदनिका क्र. ३ व ४ खरेदी केल्या आणि या बाबतचे खेरदीखत येथील दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवले. हा दस्तऐवज बँकेत जमा करणे गरजेचे असताना जमा केलेला नाही. शिवाय घेतलेल्या कर्जाच्या रकमेची परतफेड न करता खरेदी केलेल्या दोन्ही सदनिका संशयित उत्तेश्वर मनोहर मुंढे यांना खरेदीखत दस्तावर नोंदणीकृत करून दिल्या. खरेदीखत करताना बँकेकडे २५ लाख २५ हजार रुपये बाकी असतानाही सदनिका अथवा निवासी फ्लॅट मिळकतीवर कसलाही बोजा नसल्याचे खोटे नमूद केले. हे खरेदीखत करण्यात ओळख म्हणून संशयित लिंगराज लकाप्पा जाधव, उत्तेश्वर मनोहर मुंढे यांनी तक्रारदार बँकेला कोणत्याही स्वरुपाची कल्पना न देता नोंदणीकृत खरेदी करून बँकेची आर्थिक फसवणूक केली. खरेदीखत करण्यास ओळख म्हणून उद्धव तुकाराम मुंढे, नजीर मिरासाहेब बारगीर, अलताब गुलाब शेख, सुदर्शन धनचंद्र चौगुले यांनी मदत केली. या सर्व प्रकाराने ग्रामीण बँकेची २५ लाख २५ हजाराची आर्थिकी फसवणूक झाली.
या प्रकरणी मनोहर मारुती पाटील (वय ३९. रा. शिवाजीनगर, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.