(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी एका महिलेला राहण्यासाठी फ्लॅट व चांगली नोकरी देतो असे सांगून फसवणूक करणार्या एका तरुणाविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल अशोक मुरकर (रा. फणसोप) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद साक्षी पाटील (36, विमानतळ, रत्नागिरी) यांनी पोलीस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार साक्षी यांची संशयित अमोल मुरकर याच्यासोबत काही वर्षापासून ओळख झाली होती. या ओळखीतून मुरकर याने साक्षी यांना राहण्यासाठी फ्लॅट व चांगली नोकरी देतो असे आमिष दाखवले होते. यासाठी मुरकर याने पैशाची मागणी केली होती. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून साक्षी यांनी 30 ऑक्टोबर 2021 ते 10 डिसेंबर 2021 या दरम्यान 3 लाख 50 हजार रुपये प्रकाश याला दिले. साक्षी यांनी या पैशांबाबत मुरकर याला वारंवार विचारणा केली मात्र तो समाधानकारक उत्तरे देत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच साक्षी यांनी शहर पोलीस स्थानकात मुरकर याच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संशयित मुरकर याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अटक केली.