(पुणे)
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शालेय शिक्षण विभागाचे राज्यमंत्री बच्चु कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख अशा राजकीय नेत्यांचे ‘फोन टॅपींग’ प्रकरणात तत्कालीन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या विरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेमुळे मोठे राजकीय वादंग निर्माण झाले होते. या बहुचर्चित प्रकरणातून रश्मी शुक्ला यांना दिलासा मिळाला आहे. त्यांना या प्रकरणातून क्लीनचिट देण्यात आली आहे. बंड गार्डन पोलिसांनी या प्रकरणी न्यायालयात ‘क’ समरी अहवाल क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. पुणे पोलिसांनी देखील याला दुजोरा दिला आहे.
राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या फोन टॅपींग प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशी तत्कालीन पोलिस उपायक्ताची कसून चौकशी केली. संबंधित पोलिस अधिकाऱ्याचा जबाब पोलिसांकडून नोंदविण्यात आला आहे.
शुक्ला यांनी राजकीय नेत्यांचे फोन टॅप करुन ते भाजपला पुरविले असल्याच्या तसेच शुक्ला यांनी पुण्यातील कार्यकाळातही त्यांच्या पदाचा गैरवापर करून बेकायदा अभिवेक्षण (फोन टॅपिंग) केल्याचे अहवालात नमूद केले होते. त्यानुसार बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकाऱ्यांकडून सरू होता.
याप्रकरणात तत्कालीन तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली होती. शुक्ला या पोलिस आयुक्त असताना त्यांच्या कालावधीतच हे प्रकरण घडल्याने, त्यावेळी गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्तपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची देखील चौकशी करुन जबाब नोंदविण्यात आला होता.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीच रश्मी शुक्ला यांची राज्यात पुन्हा नियुक्ती होणार अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. कारण केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेल्या रश्मी शुक्ला यांनी 18 ऑगस्ट रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यांच्यापाठोपाठ भाजपचे नेते मोहित कंबोजही तिथे आले होते. शिवाय 23 सप्टेंबर रोजी रश्मी शुक्ला यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली होती.