(लातूर)
लातूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फुग्यात हवा भरताना गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने विक्रेत्याचा जागीच मृत्यू झाला, तर १२ मुलं जखमी झाली आहेत. लातूर शहरातील तावरचा कॉलनीतील इस्लामपुरा भागात ही घटना घडली. जखमींपैकी एक मुलगी ७० टक्के भाजल्याने तिची प्रकृती चिंताजनक बनली आहे.
लातूरच्या रुग्णालयातील प्रभारी अधिष्ठाता शैलेंद्र चव्हाण यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. रविवारी साडे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास लातूरमधील तावरचा कॉलनीमधील इस्लामपुरामध्ये फुग्यामध्ये गॅस भरण्याच्या सिलेंडरचा स्फोट झाला. त्यात १२ जखमी लहान मुलं रुग्णालयात आलेली आहेत. त्या नऊ लहान मुलांचं वय ३ ते १२ च्या दरम्यान आहे. त्यापैकी एका पाच वर्षाच्या मुलीला ७० टक्के भाजलं आहे. बाकी मुलांपैकी एका मुलाचा हात मोडला आहे. बाकी सर्व मुलं धोक्याबाहेर आहेत. जो फुगेवाला होता, त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह रुग्णालयात आणला असल्याचं शैलेश चव्हाण म्हणाले.
रामा इंगळे (वय ५०) असे मृत फुगेवाल्याचे नाव आहे. ते बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यामधील वाघाळा राडी येथील रहिवासी होते. या घटनेत ठार झालेला फुगेवाला हा गावोगावी फुगे विकत असे. तो काल त्याच्या लातुर येथील मुलीच्या घरी मुक्कामी होता. रविवारी तो फुगे विकण्यासाठी शहरात गेला होता. लातूरमधील तावरचा कॉलनीमधील इस्लामपुरामध्ये फुग्यामध्ये गॅस भरताना यासाठी वापरल्या जाणाऱ्या सिलेंडरचा स्फोट झाला.