(क्रीडा)
कतारमध्ये खेळल्या गेलेल्या फिफा विश्वचषक २०२२ स्पर्धेचा अंतिम सामना रोमहर्षक ठरला. मेस्सी आणि एमबाप्पेनेच्या कामगिरीच्या जोरावर अर्जेंटिना आणि फ्रान्सने ३-३ गोल केल्याने सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये पोहोचला. त्यामुळे सामन्याची रंगत वाढली होती. या अटीतटीच्या सामन्यात अर्जेंटिनाच्या मेस्सीने २ आणि एमबाप्पेने २ असे एकूण ४ गोल करीत पेनल्टी शुटआऊटमध्ये इतिहास रचला आणि तब्बल ३६ वर्षांनंतर अर्जेंटिना विश्वविजेता ठरला. अर्जेंटिनाने फ्रान्सचा अंतिम सामन्यात ४-२ असा पराभव करत तिस-यांंना वर्ल्डकपवर नाव कोरले.
लुसैल स्टेडियममध्ये रंगलेली ही अंतिम लढत रोमांचक ठरली. विशेष म्हणजे लिओनेल मेस्सीच्या कारकिर्दीतील हा अखेरची फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धा होती. त्यामुळे हा वर्ल्डकप जिंकण्याचे त्याचे स्वप्न होते. त्याने अखेर ऐतिहासिक कामगिरी करीत वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न साकारले. अर्जेंटिनाने सामन्यात ७९ व्या मिनिटापर्यंत २-० अशी आघाडी घेत सामना जवळपास खिशात टाकला होता. मात्र, फान्सच्या किलियन एम्बाप्पेने एका मिनिटाच्या अंतरावर २ गोल करत सामना बरोबरीत आणला. सामना पूर्णवेळ २-२ असा बरोबरीत राहिल्याने सामना अतिरिक्त ३० मिनिटांत गेला.
यातही पहिली १५ मिनिटे तोडीस तोड खेळ झाला. त्यानंतर मेस्सीने पुन्हा आपली जादू दाखवत १०८ व्या मिनिटाला अर्जेंटिनासाठी दुसरा गोल केला. मात्र, ११८ व्या मिनिटाला फ्रान्सच्या एम्बाप्पेने पेनाल्टीवर तिसरा गोल करत सामना पुन्हा ३-३ असा बरोबरीत आणला. अखेर सामना पेनाल्टी शूटआऊटवर गेला. तेव्हा एम्बाप्पेने पहिली पेनाल्टी गोल करत १-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर मेस्सीने पहिली पेनाल्टी अचूक मारत १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर पॉल डयबालाने अर्जेंटिनासाठी गोल करत २-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर फ्रान्सने तिसरी पेनाल्टी मिस केली. मात्र, अर्जेंटिनाने तिसरी पेनाल्टी मारत ३-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर फ्रान्सच्या मुआनीने गोल केला. मात्र अर्जेंटिनाच्या संघाने आणखी एक गोल मारत ४-२ ने विश्वकपला गवसणी घातली आणि तब्बल ३६ वर्षांनी वर्ल्डकपवर आपले नाव कोरले.
वर्ल्डकप विजयात लिओनेल मेस्सीचा मोठा वाटा आहे. त्याने स्पर्धेत ६ गोल करत वर्ल्डकप विजयाचे स्वप्न साकार केले. विशेष म्हणजे १९८६ च्या वर्ल्डकप विजयानंतर एका वर्षाने म्हणजे १९८७ मध्ये जन्मलेल्या लिओनेल मेस्सीने अखेर ३६ वर्षानंतर पुन्हा एकदा अर्जेंटिनाला विश्वविजेता बनवले.
विश्वचषक विजेता संघ ठरलेल्या अर्जेंटिनाला त्यांच्या फुटबॉल महासंघासाठी ४ कोटी २० लाख डॉलर्स मिळणार आहेत, तर दुसरीकडे पराभूत फ्रान्स संघाला ३० दशलक्ष डॉलर्स दिले जातील. फ्रान्सने २०१८ मध्ये विश्वचषक जिंकला, त्यावेळी बक्षिसाची रक्कम ३८ दशलक्ष डॉलर्स इतकी होती. स्पर्धेत खेळाडूंना सर्वच्या सर्व पैसे मिळत नसले तरीदेखील अधिकांश हिस्सा त्यांना मिळतोच. तिस-या स्थानावर असलेल्या क्रोएशियाला २ कोटी ७० लाख डॉलर्स मिळाले, तर चौथ्या स्थानावरील मोरोक्कोला २ कोटी ५० लाख डॉलर्स मिळाले.