(देवरूख / सुरेश सप्रे)
प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित इंदिरा इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी काँजचे फार्माकोग्नोसी विभागाचे प्रमुख आणि सहाय्यक प्राध्यापक सुजित नगरे यांनी नुकतीच जयपूर नॅशनल युनिव्हर्सिटी या विद्यापीठातून फार्मासुटिकल सायन्सेस या विषयात पीएचडी संपादन केली.
सन २०१९ मध्ये प्रा. नगरे यांनी पीएचडीसाठी प्रवेश घेत सोरियासिस आणि सोरियासिसच्या उपचारांसाठी वनौषधींसंबंधीचा उपयोग हा विषय प्रबंधासाठी निवडला होता. सदर विषयावर तीन वर्ष काम करत त्यांनी स्कोपस सारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानांकित वार्तापत्रांमध्ये तीन शोधनिबंध प्रकाशित केले. पीएचडी संशोधनामध्ये त्यांना जयपूर येथील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. मनीष कुमार गुप्ता आणि गोवा येथील डॉ. सुप्रिया जिरगे यांनी मार्गदर्शन केले.
त्यांच्या प्रबंधाचे परीक्षण गुरु जांभेश्वर युनिव्हर्सिटी, हिसार, हरियाणा येथील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. सुनील शर्मा यांनी केले. संस्थेचे चेअरमन व माजी राज्यमंत्री रविंद्र माने, सौ. नेहा माने, साडवली फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल खाडे यांनी प्रा. नगरे यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.