(रत्नागिरी)
फाटक हायस्कूल व श्रीमान विनायक सदाशिवशेठ गांगण कला, वाणिज्य व कै. त्रि. प. केळकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या १० वी व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शाळा व संस्थेमार्फत करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून रत्नागिरी माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ. सुवर्णा सावंत उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षा दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा सौ. अॅड . सुमिता भावे या होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री . किशोर लेले यांनी केले. प्रास्ताविक करत असताना गेल्या दोन वर्षांच्या परिस्थितीत तयारी नसताना देखील आपण सर्व उत्तम रितीने सामोरे गेलो. विद्यार्थ्यांनी केलेली तडजोड निश्चितच भावी जीवनासाठी उपयुक्त ठरेल असे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या पाहुण्यांची ओळख संस्थेचे सहसचिव श्री. विश्वेश जोशी यांनी करून दिली. शिक्षणाधिकारी सौ. सुवर्णा सावंत यांचा ‘शिक्षिका ते शिक्षणाधिकारी’ या प्रेरणादायी प्रवासाचा आम्हाला अभिमान वाटतो असे प्रतिपादन केले. १० वी व १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना १० वीतील प्रथम तीन विद्यार्थी सत्कार तसेच प्रत्येक विषयात पैकीच्या पैकी गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर १२ वी कला, वाणिज्य व विज्ञान शाखांमधून आलेल्या तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि न्यू एज्युकेशन सोसायटी रत्नागिरीच्या कार्याध्यक्षा सौ . अॅड. सुमिता भावे होत्या. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये गेल्या दोन वर्षांच्या कालखंडात ऑनलाईन व ऑफलाईन या खेळखंडोबात शाळेच्या शिक्षकांनी चांगली मेहनत घेतली. पुढील वर्ष महत्त्वाचे आहे. कारण भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे होत आहेत. संस्थेचेही शताब्दी वर्ष पूर्ण होत आहे. यावर्षी १० वी व १२ वीचा निकाल १०० % लागावा, असा संकल्प विद्यार्थी व शिक्षकांनी करावा. कार्यक्रमाचे आभार फाटक हायस्कूलचे पर्यवेक्षक श्री. राजन कीर यांनी मानले व सूत्रसंचालन सौ. नेत्रा आपटे यांनी केले. कार्यक्रमाला शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील इ. १० वी व इ. १२ वीतील विद्यार्थी उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक फार मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.