(संगलट-खेड/इक्बाल जमादार)
दापोली तालुक्यातील फरारे येथील जेटीची सुरक्षा या जेटीवरून होणाऱ्या वाळू उपश्यामुळे धोक्यात असली असून या जेटीच्या सुरक्षेकडे मेरीटाईम बोर्डाचे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे. जेटीवरून अनधिकृतपणे होणाऱ्या वाळू वाहतूकीवर कारवाईची मागणी होत आहे.
दापोलीत बेकायदेशीर वाळू उपसा आणि वाळू वाहतूक याला लगाम बसताना दिसत नाही. तालुक्यातील फरारे जेटीवर उतरल्या जाणाऱ्या वाळूची तस्करी ही भरदिवसा उन्हवरे वाकवली मार्गावरून होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या बेकायदेशीर वाळू तस्करीला अभय कुणाचे आहे, असा प्रश्न या वेळी उपस्थित होत आहे. तालुक्यातील फरारे येथे गुहागर ते दापोली असा बोटीने प्रवास करण्यासाठी जेटी बांधण्यात आली आहे. या जेटीचे अद्याप लोकार्पण देखील झाले नाही. असे असताना या जेटीचा ताबा वाळू तस्करानी घेतला असून या जेटीवर भरदिवसा वाळू उतरली जात आहे.
गेले अनेक दिवस हा खेळ सुरू असून वाकवली ते उन्हवरे या परिसरातील डंपर भरदिवसा या वाळूची वाहतूक करत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. ही बाब येथील मंडळ अधिकारी सुधीर पार्दूले यांचे निदर्शनास आणून देण्यात आली असून या बाबत आपण माहिती घेऊन कारवाई करू असे सांगितले जात आहे. तर दि ३० रोजीही उन्हवरे मार्गावरून वाकवली कडे जाणारे वाळूचे डंपर अनेक नागरिकांनी पाहीले आहेत. तर याची माहिती महसूल विभागाला देखील देण्यात आली आहे. मात्र तरी देखील कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे महसूल विभाग या वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यास हात आखडते का घेत आहे असा सवाल देखील या भागातील नागरिक उपस्थित करत आहेत. याआधी देखील या जेटीवर वाळू उतरली जात होती. याची महसूल विभागाने माहिती देखील आधी घेतली आहे. तर वाळू वाहतुकीचे डंपर यांची चाकवळ देखील महसूल विभागाने पाहिली असून तसा उल्लेख देखील या आधी महसूल विभागाने आपल्या पंचनाम्यात केला आहे. त्यानंतर काही दिवस येथे वाळू उपसा बंद होता. मात्र आता वाळू तष्करानी या जेटीचा ताबा घेतला असून मोठ्या प्रमाणात येथे वाळू उतरली जात आहे. या वाळूमूळे या जेटीचे नुकसान होणार असून मेरीटाईम बोर्ड देखील याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे स्थनिकांचे म्हणणे आहे.