(मुंबई)
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांची राजकीय ताकद दिवसागणिक वाढत आहे. हे वाढते प्राबल्य केंद्रासाठी व भाजपासाठीही डोकेदुखी ठरू शकते, यासाठी फडणवीस यांचे राजकीय पंख छाटण्याचे प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा आहे. तसेच मुख्यमंत्री असताना त्यांनी केंद्र सरकार विरोधात काही निर्णय घेतले असल्याने नव्या सरकारमध्ये त्यांचेवर केंद्रातून ‘कंट्रोल’ ठेवला जात आहे. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यासाठी केंद्राकडे मी गळ घातली, अशी कबुली उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर सभेत दिली. मात्र, फडणवीस यांना डावलण्यामागे केंद्र सरकारचा विशेषतः जे. पी. नड्डा आणि अमित शहा यांचा हात असल्याचे बोलले जाते.
सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात पक्ष नेतृत्वाच्या आदेशानुसार देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केले. त्यानंतर केंद्र सरकारकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभावर देखरेख ठेवण्यात येत आहे. यासाठी मर्जीतील अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिल्याची माहिती मिळत आहे. आता फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्री विभागात दिल्लीतून अधिकारी नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस यांची राज्यात उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्यानंतर या खात्यावर केंद्र सरकारने बारीक नजर ठेवण्याचे काम सुरू केले आहे. केंद्रात पंतप्रधान कार्यालय आणि नरेंद्र मोदी यांच्या जवळचे अधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांची फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्री खात्यात सचिव या पदावर निवड केली आहे. लवकरच आणखी काही अधिकारी केंद्रातून राज्यात पाठवले जाणार आहेत. फडणवीस मुख्यमंत्री असताना गृहखाते स्वतः कडे ठेवले होते. आताही गृहमंत्री पदासाठी फडणवीस आग्रही असल्याचे समजते. त्यामुळे आता ‘कंट्रोल’ साठी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या गृह खात्यातील एका वरीष्ठ अधिकाऱ्याला राज्यात पाठवले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
राज्यात भाजप आणि शिंदे गटाने सरकार स्थापन करत एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री घोषित केले. तसेच, मंत्रिमंडळात मी असणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. काही वेळातच केंद्रातून चक्रे फिरली आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करण्याचे निर्देश देण्यात आले. पक्षादेश मानत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. यामुळे भाजपमध्ये मोठा असंतोष असल्याचे बोलले जात आहे. अनेकांनी फडणवीसांच्या शुभेच्छा बॅनरवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना हटवले. आरएसएसचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरपर्यंत याचे पडसाद उमटले होते. अखेर देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये जाऊन राजकीय सत्तासंघर्षाचा उलगडा केला होता. तसेच एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यासाठी आपणच केंद्राकडे गळ घातली, अशी माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर सभेत दिली होती.