(खेड / इक्बाल जमादार )
दापोली तालुका शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी आणि महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस ताजुद्दिन अब्दूल गफार परकार नियत वयोमानाने तब्बल ३८ वर्षाच्या सेवेनंतर शुक्रवारी सेवानिवृत्त झाले, त्यांना दापोली तालुका शिक्षण विभागाचेवतीने छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी परकार यांनी आपण फक्त उर्दू शाळा वा उर्दू भाषेसाठीच नाही तर मराठी माध्यम आणि मराठी भाषेच्या उन्नतीसाठी प्रयत्न केल्याचे सांगितले. तसेच अध्ययन अध्यापन प्रक्रियेत अगदी शिक्षक म्हणून सुरु केलेली सेवा, केंद्रप्रमुख, शेवटी शिक्षणविस्तार अधिकारी पदापर्यंत काम करतांना नियोजन, व्यवस्थापन, आणि प्रत्यक्ष कृती यांची सांगड घालून आपण काम केल्यामुळे उर्दू शाळांना नवसंजीवन देऊ शकलो असे मनोगत व्यक्त केले. तसेच एकजूटीने सर्वांना सोबत घेऊन आपली सेवा चांगल्या प्रकारे बजावली आणि कुणाचेही मन दुखावणेचा प्रयत्न कधी केला नाही असेही त्यांनी मनोगतात सांगितले.
त्यांचेबद्दल श्रीकांत बापट, सुनिल सकपाळ, प्रविण काटकर, प्राजक्ता मुरकर, संतोष आयरे, संजय मेहता, धनंजय शिरसाट, चंद्रमणी महाडिक, शितल गिम्हवणेकर आदि केंद्रप्रमुख तर सुनिल सावंत, पद्मन लहांगे, बळीराम राठोड या विस्तार अधिकार्यांनी तसेच गटशिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, सहा.बिडिओ सुनिल खरात आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष गटविकास अधिकारी आर.एम दिघे आदिंनी त्यांचेबद्दल गौरवोद्गार काढले आणि शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिक्षण विभाग, व्हिजन दापोली,केंद्रप्रमुख संघटना, विषय साधन गट, उर्दू शिक्षक बांधव यांचेवतीने त्यांचा भेटवस्तूदेऊन सपत्निक सत्कार करणेत आला,
बहुअयामी, चिरतरुण, सदाहरित, एक आदर्श तंत्रस्नेही, परखड व्यक्तिमत्व, नम्रशील तसेच न्यायिक बाजूने सतत उभे असलेले, सर्वांगिण विचार करणारे, हवेहवेसे वाटणारे नेतृत्व, परकार नावाचा उत्साहाचा झरा उद्यापासून शिक्षण विभागात नसणार आहे, याबद्दल सर्वांनी खेद व्यक्त केला. तर माणसाला जीवनात आनंद मिळवता आला पाहिजे, गोळ्या घेऊन जगण्यापेक्षा आनंदी जीवन जगता आले पाहिजे, दुसर्याला जास्तीत जास्त ज्ञान, आनंद द्यावे, ताजूद्दिन परकार यांचेसारखे चिरतरुण, आनंदी, जीवन व्यतित करता आले पाहिजे असे गटविकास अधिकारी दिघे यांनी अध्यक्षिय मनोगतात मत व्यक्त केले.
उत्कृष्ठ निवेदक, उत्कृष्ठ प्रशासक मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी विषयात निपूण असलेल्या परकार सरांच्या सेवानिवृत्तीमुळे शिक्षण विभागात एक पोकळी निर्माण झाल्याचे सुनिल कारखेले यांनी आभार व्यक्त करतांना सांगितले.