(नवी दिल्ली)
देशातील विरोधकांनी त्यांच्या आघाडीला ’इंडिया ’नाव दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंडिया नावावरून बरीच आगपाखड केली होती. आता ‘इंडिया’ या शब्दाचे उच्चाटन करण्याचाच जणू चंग केंद्र सरकारने बांधला आहे. जी-20 सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींना राष्ट्रपती भवनातून पाठवलेल्या सहभोजनाच्या निमंत्रण पत्रामधून ‘इंडिया’ शब्दच गायब करण्यात आला आहे. ‘इंडिया’च्या जागी ’प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख करण्यात आल्यामुळे त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. एवढ्यावरच न थांबता मोदी सरकार देशाच्या राज्यघटनेतील ‘इंडिया’ हा शब्द हटवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. विशेष अधिवेशनात हा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे.
आगामी जी-20 परिषदेसाठी देशांना पाठवण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेत ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ ऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असे लिहिण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या डीनर कार्यक्रमाच्या यजमान आहेत. 9 सप्टेंबर रोजी भारत मंडपम येथे होणार्या या डीनरला जगातील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. या निमंत्रण पत्रिकेवरूनच ‘इंडिया’ हा शब्द हटवून ‘भारत’ असे लिहिण्यात आले आहे.
काँग्रेसचे नेते रमेश यांनी सोशल मीडिया वेबसाईट एक्सवर पोस्ट करत या निमंत्रणाबाबत दावा केला आहे. ते लिहितात,‘जी-20 ची बैठक 9 आणि 10 सप्टेंबर दरम्यान दिल्लीतील प्रगती मैदानावर होणार आहे. या बैठकीच्या डिनरला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रपती भवनातून निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आली आहे. सरकारने निमंत्रण पत्रिकेत देशाचे नाव बदलल्याचा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला. जयराम यांनी पुढे लिहिले की, संविधानाच्या कलम 1 नुसार, INDIA ज्याला भारत म्हटले जाते, ते राज्यांचे संघराज्य असेल. पण आता या संघराज्यावरही हल्ले सुरू आहे.’ ‘इंडिया’चे ‘भारत’ करण्याच्या प्रयत्नातले हे पहिले पाऊल आहे. आगामी विशेष संसदीय अधिवेशनात तर यावर शिक्कामोर्तब करण्याच्या हालचाली केंद्र सरकारने सुरू केल्या असल्याची आता जोरदार चर्चा आहे. संसदेचे 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. यात इंडिया शब्द हटवण्यासाठी विधेयक येणार असल्याची चर्चा सुरू आहे. भारतीय घटनेमधून इंडिया शब्द कायमचा हटवण्यासाठी केंद्र सरकारने तयारी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
दरम्यान, विरोधकांनी केंद्राच्या या हालचालींवर जोरदार हल्लाबोल केला. ‘जर काही पक्षांच्या आघाडीने नाव इंडिया ठेवले तर देशाचे नाव बदलणार? हा देश 140 कोटी जनतेचा आहे, कोणत्या एका पक्षाचा नाही. समजा उद्या विरोधी आघाडीने नाव बदलून ‘भारत’ ठेवले तर मोदी ‘भारत’ हेही नाव हटवून भाजप ठेवणार का,’ असा खोचक सवाल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. ‘इंडिया’ नाव हटवण्याचा अधिकार कोणालाही नाही,’ अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. दुसरीकडे भाजपचे मंत्री केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत आहेत. माझ्या देशाचे नाव ‘भारत’ आहे. यात काँग्रेसला काय अडचण आहे, असा सवाल केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी उपस्थित केला. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा म्हणाले, ‘प्रजासत्ताक भारत – आनंद आणि अभिमान आहे की आमची सभ्यता अमृत कालच्या दिशेने धैर्याने पुढे जात आहे.’
खेळाडूंच्या जर्सीवरही ’भारत’ हवे – माजी क्रिकेटपटू सेहवागची मागणी
देशाच्या नावावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली असताना भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागच्या सोशल मीडियावरील एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. सेहवाग यांनी ट्विट करत म्हटले की, मला नेहमीच वाटते की, आपल्यामध्ये अभिमान जागृत करणारे देशाचे नाव असावे. आम्ही भारतीय आहोत, ‘इंडिया’ हे ब्रिटिशांनी दिलेले नाव आहे आणि आमचे मूळ नाव ’भारत’ आहे. हे नाव अधिकृतरित्या परत मिळण्यास बराच काळ लोटला आहे. त्यामुळे मी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांना आग्रह करतो की, आगामी विश्वचषकात आमच्या खेळाडूंच्या छातीवर अर्थात जर्सीवर ’भारत’ असावे.