(रत्नागिरी)
तालुक्यातील जयगड पंचक्रोशी हादरली आहे. तालुक्यातील नांदिवडे भंडारवाडी येथे एका प्रौढाची हत्या झाल्याचे उघडकीस आली आहे. या प्रकरणी संशयित म्हणून पोलिसांनी मयताच्या पत्नीसह एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
नांदेड भंडारवाडी येथील सुरेश धोंडू पडवळ (64 वर्षे) या प्रौढाची धारदार हत्यारांनी डोके तसेच छातीत वार करून हत्या करण्यात आली आहे. रत्नागिरी तालुक्यातील जयगड जवळ नांदिवडे येथ ६४ वर्षीय पतीची पत्नीने हत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नांदिवडे येथील सुरेश धोंडू पडवळ यांचा शुक्रवारी सकाळी स्वतःच्या पत्नीने धारधार हत्यारांनी खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेने अवघे रत्नागिरी हादरले आहे. सुरुवातीला आपण काही केलेच नाही असा कावा करणाऱ्या पत्नीचा व संशयित प्रियकराचा हा सगळा बनाव ग्रामस्थांची समयसूचकता व पोलिसांची तत्परता यामुळे डॉग स्कॉडच्या मदतीने उघड झाला आहे. पत्नीने धारदार सुरीच्या सहाय्याने हा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
26 जानेवारी रोजी शुक्रवारी आपले पती घरात रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. आपण त्यांना अंगणात आणल आहे. त्यांना दवाखान्यात घेऊन जायचं आहे असा कांगावा करत तिने गावात माहिती दिली. या सगळ्या प्रकारचा ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांकडे संपर्क केला. काही वेळातच पोलिस यंत्रणा डॉगस्कॉड सहित घटनास्थळी दाखल झाली. जवळच झाडाखाली पडलेल्या रक्त लागलेल्या काठया दिसल्या याचा वास डॉगस्कॉडला देण्यात आला. यावेळी डॉगस्कॉड या ठिकाणी असलेली शितल पडवळ व मनोज चव्हाण यांच्या अंगावरच दोन-तीन वेळा गेल्याने या दोघांनीच हा सगळा बनाव रचल्याचे उघड झाले.
याप्रकरणी संशयित पत्नी शितल पडवळ व पत्नीचा प्रियकर संशयित मनराज दत्ताराम चव्हाण यांना जयगड पोलिसांनी अटक केली आहे. जयगड येथे रहाणारे मयत सुरेश धोंडू पडवळ हे मोल मजुरीचे काम करायचे. पत्नी शितल पडवळ हिचा गावातच एक स्टॉल असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. यापूर्वीही असा जीवघेणा हल्ला पती सुरेश पडवळ यांच्यावर पत्नीने केला होता अशी माहिती आता तपासात समोर आली आहे.
मात्र त्याच वेळेला त्यांची पत्नी शितल सुरेश पडवळ व तिचा प्रियकर मनराज दत्ताराम चव्हाण यांचे प्रेमसंबंध असल्याचा संशय त्यांच्या पतीला होता. यावरून घरात सातत्याने भांडण सुरू होती. याच रागात शितल पडवळ हिने निर्दयीपणे खून करत सुरेश पडवळ यांचा काटा काढल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
जयगड पोलिसांनी संशयित आरोपी शितल पडवळ व मनराज दत्ताराम चव्हाण ( मु. नांदिवडे भंडारवाडा) यांना ताब्यात घेतले असून या दोन्ही नराधमांवर भा.द. वि. क 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक क्रांती पाटील, जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अधिक तपास करत आहेत.