(मुंबई)
एका तरुणीशी प्रेमसंबंध प्रस्थापित करत तिचे अश्लील छायाचित्रण करून त्याच्या आधारे तिचे धर्मांतर व जबरदस्तीने विवाह केल्याचा प्रकार मीरा रोड येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी नयानगर पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, तीन वर्षांपूर्वी तिची आरोपीशी ओळख झाली होती. आरोपीने पीडितेवर प्रेम असल्याचे सांगितले, मात्र पीडितेने त्याला नकार दिला. त्यामुळे आरोपीने आत्महत्या करण्याची धमकी दिल्यामुळे पीडितेने त्याला होकार दिला. एके दिवशी आरोपीने पीडितेला त्याच्या घरी बोलावून आरोपीने पीडितेसोबत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. या वेळी आरोपीने पीडितेचे अश्लील चित्रीकरण केल्याचे तिला सांगितले. ते व्हायरल करण्याची धमकी देत तो तिला मुंबईला घेऊन गेला व त्याठिकाणी तिचे धर्मांतर करून तिच्याशी विवाह केला. त्यानंतर आरोपी पीडितेला घरी घेऊन गेला असता त्याचा आधीच एक विवाह झाला असून त्याला एक मुलगीदेखील असल्याचे पीडितेला समजले.
दरम्यान, आईशी वाद झाल्याने आरोपीने भाड्याने स्वतंत्र घर घेतले व त्याठिकाणी दोघे राहू लागले. बाहेर जाताना तो घराला कुलूप लावून पीडितेला डांबून ठेवू लागला. अनेकवेळा त्याने तिला मारहाणदेखील केली. आरोपीची आईदेखील पीडितेला दुबईला जाण्यासाठी तगादा लावू लागली. त्यामुळे अखेर एक दिवस पीडितेने संधी साधून घरातून पळ काढला व आपले घर गाठले. त्यानंतर पीडित तरुणीने नयानगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीसह त्याचे कुटुंबीय व मित्र अशा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून सर्वांना अटक करण्यात आली आहे.