बॉयफ्रेंडसाठी मोठ्या बहिणीने आपल्या सख्खा बहिणीचाच ओढणीने गळा आवळून खून केला असल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातून समोर आली आहे. प्रेम प्रकरणाबद्दल घरच्यांना माहिती दिली, तसेच प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी अडथळा आणल्याच्या रागातून मोठ्या बहिणीने लहान बहिणीची गळा दाबून हत्या केल्याची घटना पुढे आली आहे. अहमदनगरमधील कोपरगाव तालुक्यात ही हादरवून टाकणारी घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे बॉयफ्रेंडसाठी तिने हे पाऊल उचलले आहे. बहिणीचा खून करुन ही तरुणी चक्क प्रियकरासोबत पळून गेली होती. ही घटना उघडकीस आल्यानंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
अहमदनगरच्या कोपरगावातील कोकमठाण शिवारामध्ये 30 सप्टेंबर रोजी एका 16 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याचे समोर आले होते. या मुलीने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आपले जीवन संपवले असे सुरुवातीला वाटत होते. या घटनेचा तपास पोलिस करत होते. या तपासात धक्कादायक सत्य समोर आले आहे. हर्षदाने आत्महत्या केली नव्हती तर तिच्या सख्ख्या मोठ्या बहिणीनेच तिची गळा आवळून हत्या केली होती. पोलिसांनी आरोपी बहिणीला अटक केली आहे.
हर्षदा बानकर हिची मोठी बहिण सृष्टीचे (१९) श्रीरामपूर तालुक्यामधील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. आकाश कांगुणे असे या तरुणाचे नाव आहे. आपल्या मोठ्या बहिणीच्या प्रेमसंबंधांची माहिती धाकट्या हर्षदाने घरच्यांना दिली. यावेळी घरातील लोकांनी सृष्टीला समजावले. तिला काही दिवस कॉलेजमध्ये जाऊ नकोस, अशी ताकीद कुटुंबियांनी दिली. मात्र या घटनेमुळे सृष्टीच्या मनात हर्षदाविषयी राग निर्माण झाला होता.
सृष्टी ही प्रियकरासोबत लवकरच पळून जाणार असल्याचे समजल्यावर हर्षदाने तिला विरोध करण्यास सुरुवात केली. मात्र सृष्टीने काहीही विचार न करता गाफील असताना हर्षदाचा ओढणीने गळा आवळला. यामध्ये हर्षदाचा मृत्यू झाला. बहिणीची हत्या करून आरोपी मोठी बहिण सृष्टी प्रियकरासोबत ठरल्याप्रमाणे पळून गेली.
यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी आरोपी बहीण आणि तिचा प्रियकर यांना श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथून ताब्यात घेतले. यानंतर तिने खुनाची कबुली दिली आहे. आईच्या तक्रारीनंतर आरोपी सृष्टीवर कलम 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.