(मुंबई)
कोरोनाच्या संकटामुळे सहायक प्राध्यापक, प्राचार्य, शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल यांच्या भरतीवर घातलेले निर्बंध अखेर उठवण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि महाविद्यालयाच्या प्रशासनिक बाबींवर होणारा विपरित परिणाम विचारात घेऊन वित्त विभागाने हे निर्बंध शिथिल करून पद भरती करण्यास मान्यता दिली असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.
उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील अकृषी विद्यापीठातील संलग्नित ११७७ अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये रिक्त असणारी शिक्षक व शिक्षकेतर पदे भरण्यास उच्च स्तरीय समितीने मान्यता दिली होती. मात्र कोविडची परिस्थिती लक्षात घेता १२ नोव्हेंबर २०२१ रोजीच्या शासन निर्णयाने पद भरतीवर निर्बंध घालण्यात आले होते. भरतीवरील हे निर्बंध उठवण्यास वित्त विभागाने परवानगी दिली असल्याची माहिती मंत्री पाटील यांनी दिली.
नव्या निर्णयानुसार आता २०८८ सहायक प्राध्यापक पदाच्या पद भरतीवरील निर्बंध उठविण्यात आले आहेत. तसेच १०० टक्के रिक्त होणारी प्राचार्य संवर्गातील पदे भरण्यासदेखील मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय उच्च स्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या पदांपैकी ग्रंथपाल : १२१ आणि शारीरिक शिक्षण संचालक : १०२ अशी एकूण २२३ पदे भरण्यास दिलेली स्थगिती शिथिल करण्याबाबत वित्त विभागाने मंजूरी दिली असून त्यानुसार पद भरतीस मान्यता देण्यात आली आहे.