(रत्नागिरी/प्रतिनिधी)
शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांसाठीच्या सॉफ्टवेअरची तांत्रिक चाचणी अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही दिवसात ते कार्यान्वित होईल. बदल्यांचे निकष ठरवताना सर्वसाधारण कार्यक्षेत्रात दहा वर्षे आणि एकाच शाळेवर पाच वर्षे पूर्ण करणारे, अवघड क्षेत्रात तीन वर्षे सेवा करणार्या शिक्षकांना बदलीचा हक्क आहे. यासह संवर्ग एकमधील दुर्धर आजाराने पीडित शिक्षक, मतीमंद मुलांचे माता पिता, पती आणि पत्नी एकत्रिकरण या प्रकारात मोडणारे शिक्षक बदलीसाठी पात्र आहेत.
शिक्षकांच्या बदल्यांसाठी युडायसनुसार शाळा आणि शिक्षकांची माहिती अद्ययावत करणे, शिक्षकांचे रोस्टर अद्ययावत करुन त्यास विभागीय आयुक्तांची मंजुरी घेणे, अवघड क्षेत्रातील शाळा निश्चित करणे, शिक्षकांचे आधार अपडेट करणे, शिक्षकांचे समानीकरण करणे, न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांच्या नेमणुका करणे आदी विषयाचा समावेश होता. या सूचनानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने सर्व माहिती अद्ययावत करुन बदली पात्र शिक्षकांची माहिती, रिक्त जागांचा तपशील, शिक्षकांची जन्मतारीख, आधार नंबर, पॅन नंबर, शाळा बेस, शिक्षक बेस माहिती तयार करुन ती ग्रामविकास विभागाला सादर केली आहे.
राज्यस्तरावरुन बदली प्रक्रिया पूर्ण करणे शिल्लक आहे. यासाठी 31 मे पर्यंतचा कालावधी आहे. 10 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होणे अशक्य असल्याने बदल्यांबाबत शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.