( खेड / इक्बाल जमादार )
दापोली- खेड- मंडणगड मतदारसंघातील सर्व प्राथमिक शिक्षकांशी माझे जिव्हाळ्याचे नाते आहे. आज या अतुट प्रेमापोटीच मी मुंबईतील आजचे सर्व कार्यक्रम बाजूला ठेवून दापोलीतील शिक्षक संघाच्या कार्यक्रमासाठी मुद्दाम आलो आहे. या मतदार संघातील प्राथमिक शिक्षकांचे सर्व प्रश्न व समस्या प्राधान्याने सोडविण्याला माझे नेहमीच प्राधान्य राहणार असून मी निश्चितपणाने हे प्रश्न सोडविणार आहे, असे प्रतिपादन दापोली-मंडणगड-खेडचे आमदार श्री योगेश कदम यांनी दापोली येथील शिक्षक संघाच्या तालुका मेळाव्याच्या व्यासपीठावरून बोलताना केले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या दापोली तालुका शाखेने नुकतेच दापोली येथे तालुका मेळावा व गुणवंत सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विचार व्यक्त करताना आमदार योगेश कदम यांनी वरील विचार व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर दापोलीचे गटविकास अधिकारी आर. एम. दिघे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संपर्कप्रमुख विकास नलावडे, जिल्हाध्यक्ष संतोष कदम, सरचिटणीस संदीप जालगांवकर, कार्याध्यक्ष कैलास शार्दुल, पतपेढीचे संचालक अजय गराटे, शांताराम पवार, दापोली तालुकाध्यक्ष जीवन सुर्वे तालुका सचिव सचिन नावडकर, कार्याध्यक्ष, गणेश तांबिटकर कोषाध्यक्ष संतोष कदम, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माजी समाजकल्याण सभापती चारुता कामतेकर, माजी समाजकल्याण सभापती श्री भगवान घाडगे, शिक्षण विस्तार अधिकारी सर्वश्री पद्मन लहांगे, रामचंद्र सांगडे, बळीराम राठोड, ताजुद्दीन परकार, आदी मान्यवर उपस्थित होते.
दापोली तालुकाध्यक्ष जीवन सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमात बोलताना आमदार योगेश कदम पुढे म्हणाले की, जुनी पेंशन योजना हा केवळ प्राथमिक शिक्षकांचा विषय नसून तो सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचा आहे. मात्र या विषयासाठी विशेष अभ्यासगटाची स्थापना झाली आहे. राज्य सरकार याबाबतीत सकारात्मक असून शासन अभ्यासाअंती योग्य निर्णय निश्चित घेणार आहे. शिक्षक बदली प्रक्रियेतील सहावा टप्पा काही शिक्षकांसाठी त्रासदायक ठरत असल्याची शासनाला माहिती प्राप्त झाली आहे.
विशेष करून वयाची पन्नाशी पार केलेल्या शिक्षकांना याचा त्रास होताना दिसतो आहे. याबाबतीत ग्रामविकास मंत्र्यांशी आपली चर्चा झाली असून मी शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांची व त्यांची भेट घडवून आणली आहे. याबाबतीत निश्चित सकारात्मक तोडगा निघेल. शिक्षकांवर मुख्यालयी राहण्याचे बंधन व सक्ती असता कामा नये असे मला स्वतःला वाटते. या बाबतीत माननीय मुख्यमंत्र्यांनी याच संघटनेच्या राज्यस्तरीय रत्नागिरी अधिवेशनात या बाबतीत योग्य तो निर्णय घेण्याचे व दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्री सर्व शिक्षकांप्रती अतिशय सकारात्मक व संवेदनशील असून ते निश्चित या विषयावर तोडगा काढतील याची खात्री आहे. आंतरजिल्हा शिक्षक बदल्या व नवीन शिक्षक भरती या विषयावर मी पाठपुरावा करून रत्नागिरी जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांची जास्तीची रिक्त पदे राहणार नाहीत यासाठी प्रयत्न करणार आहे.
दापोली तालुका प्राथमिक शिक्षक संघ आयोजित या मेळाव्यात दापोली तालुक्यातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, नवोदय विद्यालय प्रवेशपात्र विद्यार्थी, आर टी एस परिक्षेत!चमकलेले विद्यार्थी, नासा- इस्रो भेटीसाठी पात्र ठरून इस्रोची वारी करून आलेले विद्यार्थी, जिल्हा परिषदेच्या आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त शाळा आणि आदर्श शिक्षक, तसेच दापोली पंचायत समिती चे गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, सेवानिवृत्त शिक्षक आदींचा मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान व सत्कार करण्यात आला.
यावेळी दापोली तालुक्यातील बहुसंख्य प्राथमिक शिक्षक, विद्यार्थी, पालक, शिक्षणप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी नावडकर व अमोल कोंडुसकर यांनी केले तर जिल्हासचिव संदीप जालगांवकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले