(जाकादेवी/वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील खालगांव जाकादेवी येथील देवस्थान कमिटीचे धडाडीचे विद्यमान अध्यक्ष तसेच जाकादेवी येथील प्रसिद्ध व्यावसायिक संभाजी बाळू गोताड यांचे वयाच्या ५२ व्या वर्षी बुधवार दि.२८ सप्टेंबर रोजी पहाटे दुःखद निधन झाले.
संभाजी बाळू गोताड हे अत्यंत प्रेमळ, कष्टाळू, हसतमुख स्वभावाचे व्यक्तिमत्व होते. शेती व व्यवसाय-उद्योगात त्यांना प्रचंड आवड होती. गावातील नमन कलाकृतीबरोबरच नाट्य क्षेत्रातही त्यांनी अनेक भूमिका यशस्वीपणे साकारल्या. जाकादेवी-खालगाव येथील किराणा मालाचे प्रसिद्ध दुकानदार म्हणून त्यांनी आपले स्वकर्तृत्वावर नाव कमावले होते.
अलीकडेच काही महिन्यांपूर्वी जाकादेवी खालगाव देवस्थान कमिटीच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली होती. ग्रामस्थांच्या एकजुटीवर त्यांनी गावात सार्वजनिक कार्यात चांगले योगदान दिले.
त्यांच्या अकाली निधनामुळे गोताड कुटुंबियांसह संपूर्ण गावावर तसेच परिसरातील गावावरही शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ,भावजय, बहीण, पुतणे असा परिवार आहे. त्यांच्या अंत्ययात्रेत सर्व स्तरातील नागरिक, रत्नागिरी-संगमेश्वर तालुक्यातील व्यवसाय-उद्योगागातील अनेक मान्यवर मंडळी सहभागी झाली होती.