(पुणे)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नुकतेच पुण्याचे पालकमंत्रिपद मिळाले आहे. पण आता एका वेगळ्याच प्रकरणामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकात अजित पवारांवर नाव न घेता गंभीर आरोप केले आहेत. जिल्ह्याचे मंत्री दादा यांनी पोलिसांच्या कार्यालयासाठी राखीव असलेली जमीन एका बिल्डरला विकली, असा आरोप केला आहे. त्यामुळे या प्रकरणात विरोधकांकडून अजित पवारांच्या चौकशीची मागणी होऊ शकते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या पुस्तकात अजित पवार यांच्या नावाचा थेट उल्लेख न करता त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 2010 च्या एका जमिनीच्या लिलाव प्रकरणाचा बोरवणकरांनी उल्लेख केला आहे. परंतु, मीरा बोरवणकरांच्या या आरोपांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळून लावले आहेत.
माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी अजित पवारांवर गंभीर स्वरुपाचे आरोप केल्यानंतर विरोधकांकडून मात्र त्यांच्यावर चांगलाच निशाणा साधण्यात आला आहे. परंतु या आरोपांना फेटाळत अजित पवार म्हणाले की, मी अशा प्रकारच्या लिलावांचा विरोध केलेला आहे. पालकमंत्र्यांना जमिनीचे लिलाव करण्याचा अधिकार नसतो. सरकारी जमिनी आपण विकू शकत नाही. महसूल विभागाकडे ती प्रकरण जातात आणि राज्याच्या कॅबिनेटमध्ये त्याबाबत निर्णय होतात. माझा या प्रकरणाशी कसलाही संबंध नाही. तुम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा करुन बघा मी अशा प्रकरणांमध्ये शासनाची बाजू घेतलेली आहे. माझ्यावर तशा प्रकरणांमध्ये दबाव आणला तरी मी त्याची फिकीर करत नाही, असे स्पष्टीकरण अजित पवार यांच्याकडून या प्रकरणावर देण्यात आले आहे.
काय लिहिले आहे पुस्तकात?
माजी आयपीएस अधिकारी असलेल्या मीरा बोरवणकर यांच्या ‘मॅडम कमिशनर’ पुस्तकांत लिहिण्यात आले आहे की, पुण्याच्या पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटले. तसेच आसपासच्या पोलीस ठाण्यातील गुन्ह्याचा आढावा घेतला. एक दिवस विभागीय आयुक्तांचा फोन आला. त्यांनी म्हटलं की पुण्याचे पालकमंत्री तुमच्या बद्दल विचारत आहेत. त्यांना तुम्ही एकदा भेटा, येरवाडा पोलीस स्टेशनच्या जमिनीसंदर्भातील विषय असल्याचं त्यांनी मला सांगितलं. विभागीय कार्यालयात मी पालकमंत्र्याची भेट घेतली. पालकमंत्र्यांकडे येरवडा पोलीस स्टेशन परिसराचा नकाशा होता. त्यांनी सांगितलं की या जमिनीला लिलाव झाला आहे. जो जास्त बोली लावेल त्याच्यासोबत जमीन हस्तांरणाची प्रक्रिया पार पाडावी, मी पालक मंत्र्यांना सांगितलं की येरवडा पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणी आहे. भविष्यात मोक्याच्या ठिकाणी जागा मिळणार नाही, असे स्पष्टपणे या पुस्तकांत लिहिण्यात आले आहे.]
तसेच, कार्यालयं आणि पोलीस वसाहतीसाठी आपल्याला या जागेची गरज असल्याचं मी त्यांना सांगितलं. मी आताच आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारलेला असताना सरकारी जमीन खासगी व्यक्तीला दिल्यास माझ्याकडे चुकीच्या नजरेनं बघितलं जाईल. पण, त्या मंत्र्याने माझं काहीही ऐकलं नाही आणि जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचा आग्रह धरला. मात्र मी नकार दिल्यानंतर त्यांनी जागेचा नकाशा काचेच्या टेबलवर भिरकारला, असा गंभीर आरोप मीरा बोरवणकर यांच्याकडून करण्यात आला आहे. बोरवणकर यांच्या या आरोपांमुळे आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.