(चेन्नई)
तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक जी. मारीमुथू यांचे काल हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ५८ वर्षाचे होते. मारीमुथू हे नुकतेच अभिनेता रजनीकांत यांच्या जेलर चित्रपटात चमकले होते. त्यांच्या निधनामुळे तमिळ सिनेसृष्टीवर शोककळा पसरली होती.
जी. मारीमुथू हे टेलिव्हिजनसृष्टी प्रमाणे चित्रपटसृष्टीतले ही प्रसिद्ध पटकथा आणि संवाद लेखक होते. मारीमुथू यांनी १९९९ मध्ये अजितच्या ‘वाली’ चित्रपटामध्ये सहाय्यक भूमिका साकारली होती. हा चित्रपट त्यांच्या फिल्मी कारकिर्दीमधील पहिला चित्रपट होता. या चित्रपटानंतर जी मारीमुथू यांनी ‘असाई’ या चित्रपटामध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. त्या चित्रपटामध्ये अजित, सुवलक्ष्मी आणि प्रकाश राज हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.
२००८ मध्ये ‘कन्नम कन्नम’ या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यांनी त्या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लेखन केले असून चित्रपटामध्ये त्यांनी एक छोटी भूमिका साकारली होती. युद्धम सेई (२०११), कोडी (२०१६), बैरवा (२०१७), काडैकुट्टी सिंगम (२०१८), शिवरंजिनीयुम इनुम सिला पेंगलम (२०२१), आणि अतरंगी रे (२०२१) या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या होत्या.