( मुंबई )
‘देसी देसी ना बोल्या कर छोरी’ या गाण्याचे प्रसिद्ध गायक राजू पंजाबी यांनी मंगळवारी (२२ ऑगस्ट) अखेरचा श्वास घेतला आहे. वयाच्या अवघ्या ४०व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून राजू यांना हिस्सार येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राजू पंजाबी यांना काळी कावीळ झाली होती. या आजारामुळे त्यांच्या यकृत आणि फुफ्फुसात संसर्ग झाला होता. प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, उपचारांदरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.
राजू पंजाबी यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीत सुधारणा देखील झाली होती. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र, पुन्हा एकदा त्यांना प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राजू पंजाबी यांच्यामागे पत्नी आणि ३ मुली असे कुटुंब आहे. हरियाणा, पंजाब आणि राजस्थानमध्ये ते अतिशय प्रसिद्ध गायक होते. त्यांची अनेक गाणी लोकप्रिय ठरली होती. ‘बिग बॉस’ फेम सपना चौधरीसोबतची त्यांची जोडी खूप गाजली होती. हरियाणातील संगीत विश्वाला त्यांनी एक नवी ओळख मिळवून दिली होती.
राजू पंजाबीचे यांचे शेवटचे गाणे १२ ऑगस्टला रिलीज झाले होते. मात्र, यादरम्यान त्यांना रुग्णालयातच दाखल करण्यात आले. ‘आपसे मिलेके यारा हमको अच्छा लगा था’ या त्यांच्या शेवटच्या गाण्याच्या तयारीला तब्बल २ वर्ष लागली होती.