(रत्नागिरी)
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर, हरमित सिंग, सिद्धेश लाड यांना घडवणारे प्रशिक्षक दिनेश लाड रत्नागिरीत आले असून, रविवारपासून सुरू झालेल्या श्री जय भैरव चषक लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. मागील 27 वर्षे ते मुंबईत क्रिकेटचे मोफत प्रशिक्षण देत आहेत. रत्नागिरीत क्रिकेटला मोठा वाव आहे. येथील खेळांडूमध्ये गुणवत्ता आहे. त्यांना दर्जेदार सुविधा दिल्यास येथून देशाचे खेळाडू घडतील, असा विश्वास क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांनी व्यक्त केला.
यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, यापूर्वी रत्नागिरीतील याच स्टेडियमवर रणजी चषक स्पर्धेचे सामने झाले आहेत. मात्र, आताची खेळपट्टी ही क्रिकेटसाठी पोषक नाही. येथील अॅकॅडमीतही मॅटवर प्रशिक्षण दिले जात आहे. मॅटवरचे क्रिकेट आणि प्रत्यक्षातील टफ खेळपट्टीवरील क्रिकेट यात मोठी तफावत आहे. येथील खेळाडूंना मुंबई, पुण्याला जावे लागत आहे. रत्नागिरीत चांगले मैदान कसे तयार होईल याकडे पाहणे गरजेचे आहे. चांगली खेळपट्टी बनवल्यास त्याचा फायदा येथीलच खेळाडूंना होणार आहे.
टी-20 क्रिकेट नसून फक्त ‘एंटरनेटमेंट’
टी-20 हे क्रिकेट नसून फक्त ‘एंटरटेनमेंट’ असल्याचे परखड मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. कमी षटकात जास्तीत जास्त धावा कराव्या लागत असल्यामुळे अशा सामन्यात फलंदाज कशीही फटकेबाजी करतो. रणजी सामन्यातून भारतीय संघाची निवड होणे अपेक्षित असताना टी-20 सामन्यातून खेळाडूंची निवड होणे चुकीचे आहे. टी-20 सामन्यांमुळे विकेटवर टिकून राहण्याची क्षमता खेळाडूंमध्ये येत नाही.
असोसिएशनने खेळाडूंचा ‘बंच’ तयार करावा
जिल्ह्यात शालेय स्तरावर 12 वर्षाखालील क्रिकेटचे सामने आयोजित करावेत. यातून 20 खेळाडूंचा ‘बंच’ तयार करावा. या खेळांडूना क्रिकेट असोसिएशनने विशेष सुविधा पुरवाव्यात. त्यांना चांगले बॉल, कीट द्यावेत. पुढील चार वर्षे त्यांच्यासाठी एकच प्रशिक्षक नेमावा. यामुळे त्या खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळेल. प्रशिक्षकांवर पालकांनी विश्वास ठेवावा मुलांना प्रशिक्षण देताना अनेकवेळा पालक मधेमधे विनाकारण लुडबूड करतात. यामुळे प्रशिक्षकांना त्या खेळाडूवर लक्ष्य केंद्रीत करता येत नाही. पालकांनी हा प्रकार थांबवावा. प्रशिक्षकांवर त्यांनी विश्वास ठेवावा. आपली मुलं आयपीएलपेक्षा देशाच्या संघात कशी तयार होतील ते पहावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
रोहितवर कर्णधारपदाचा तणाव नाही रोहित शर्माची भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाल्यानंतर त्याच्या बॅटची धार कमी झाली आहे. त्याचा स्वतःवर ठाम विश्वास आहे. लवकरच तो या परिस्थितीतून बाहेर पडेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांच्यासोबत पीच क्युरेटर मधू बोटले, क्रिकेट प्रशिक्षक बाबा चव्हाण, पंच अजित भाटकर, कै. छोटू देसाई अॅकॅडमीचे कार्याध्यक्ष रमेश कसबेकर, सचिव दीपक देसाई, अमित लांजेकर आदी उपस्थित होते.